Sunday, 25 October 2009

परदेशी लोकांविषयीचे विनोद.....

1.

एका चायनिज माणसाने स्वतःच्या नावाने उघडलेल्या चहावाढपी टपरीचे नाव मराठीत काय असेल?
......
......
फुंकून फुंकून चा पी

एका जपानी माणसाने मराठी शाळा उघडली, तिचे नाव काय असेल?
.....
.....
या-शिका

एका अमेरीकन माणसाने त्याच्या समोरच स्वतःची मराठी शाळा उघडली, तर तिचे नाव काय असेल?
.....
.....
शिका-गो

टांझानियन माणसाने गिरगावात स्विमिंग पूल उघडला त्याचे नाव असेल?
......
.....
या डुंबा डुंबा

त्या स्विमिंग पूलचा रखवालदार रशियन असेल तर त्याचे आडनाव काय?
.....
.....
उभा-का?-बस्की

******************************

2.

न्यूयॉर्कच्या एंपायर स्टेट बिल्डींगच्या शेवटच्या माळ्यावर एक मस्त बार नुकताच उघडलेला असतो. त्या बार मध्ये दोन अनोळखी माणसं बसलेली असतात, रात्री १ वाजता. बाकी तिथे बार-अटेंडण्ट शिवाय कुणी नसतं. तोही त्याच्या कामात बिझी असतो. दारूच्या नशेत ह्या दोघांत वाद सुरू होतो.

पहिला म्हणतो, "एंपायर स्टेटचा हा माळा इतक्या उंचीवर आहे की गॅलरीच्या बाहेर उडी मारलीस तर वारा तुला पुन्हा गॅलरीत ढकलेल. कुणी इथून आत्महत्या करूच शकत नाही!!!"

दुसरा म्हणतो, "च्याक! शक्यच नाही"
पहिला म्हणतो, "दाखवू?"
"हो दाखव!"
"हे बघ", असं म्हणून तो गॅलरीत जातो आणि खरोखरीच बाहेर उडी मारतो. दुसरा धावत जाऊन गॅलरीच्या बाहेर पाहतो, तर पहिल्याचा कुठेच पत्ता नाही.
"मी इकडे आहे", पहिला हाक मारतो. बघतो तो तर काय, तो ह्याच्या मागेच उभा असतो.
"पाहिलं मी काय म्हणत होतो ते!"
"तू काहीतरी ट्रीक केलीस. पुन्हा करून दाखव!"
"हे बघ!", असं म्हणून पहिला पुन्हा उडी मारतो अन दुसऱ्याच्या समक्ष बाहेरून पुन्हा गॅलरीत अलगद येऊन बसतो
एव्हाना दुसऱ्याची धुंदी कुठे गायब झालेली असते. पहिला हसत हसत आत जाऊन पुन्हा दारू प्यायला बसतो.
इकडे दुसऱ्याला माज चढतो. त्याला वाटते आपणही हे करू शकू. धुंद अवस्थेत तोही गॅलरीच्या बाहेर उडी ताकतो पण हाय ! दुसरा जाऊन सरळ जमिनीवर आपटतो.

...... एव्हाना दुसरा वैकुंठवासी झालेला असतो.

इकडे आत पहिला आणखी दारूचे ग्लास रिचवत दुसऱ्याची वाट पाहत बसलेला असतो, तोच बार अटेंडण्ट येऊन ह्याला म्हणतो, "बार बंद व्हायची वेळ झाली, श्रीयुत सुपरमॅन!!!!"

**************************

3.

ब्रिटीश, अमेरिकन, चायनिज आणि भारतीय मित्र एका होटेलात चहा पीत बसलेले असतात. तोच त्या सगळ्यांच्या कपात ओळीने माशा पडतात.

ब्रिटीश मित्र म्हणतो, "सकाळ फुक्कट गेली. श्शी!" आणि असं म्हणून तो चहा फेकून देतो.

अमेरीकन, "मी माझा चहा फुकट जाऊ देईनच कसा?", असं म्हणून तो माशीला चाटतो अन तिला फेकून मग कपातला चहा पितो.

चायनिज थोडा वेळ माशीकडे पाहतो अन म्हणतो, "वॉव्व!! आज चायनिज चहा!!!" आणि माशीला गिळून ऊरलेला चहा फेकून देतो.

भारतीय मित्र गुजराथी असतो अन हे सगळं पाहत असतो. सगळ्यांचे चहा पिऊन झाल्यवर माशिला चहातून वेगळे काढून तो चहा अर्ध्या पैशात अमेरिकन मित्राला आणि अर्ध्या किमतीत ती माशी त्या चायनिज मित्राला विकून, मिळकतीतून आलेल्या पैशात स्वतःचा नवा चहा मागवतो!!!!

******************************

4. ब्रिटीश विनोदात आयरिश लोकं म्हणजे भारतीय विनोदात सरदार. हा एक आयरिश जोक आहे.

एकदा लहान मुलांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेने आयर्लॅण्ड मध्ये आपले जागतिक स्म्मेलन आयोजित केले होते. सम्मेलनास बरेच आयरिश नागरिक उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षाने लोकांना आफ्रिकेत कुपोषणाने मरणाऱ्या लहान मुलांसाठी मदत करायचे आवाहन केले होते. पण म्हणावं तेवढी मदत झाली नव्हती. म्हणून कुपोषणाच्या भीषणतेचा एक नमुना सादर करावा म्हणून अध्यक्षांनी सगळ्यांना शांत राहून त्या मुलांसाठी प्रार्थना म्हणण्यास सांगितले.

जेव्हा उपस्थित आयरिश पाव्हणे शांत बसले तोच अध्यक्षांनी एक टाळी वाजवली. सगळे कोड्यात अध्यक्षाकडे पाहून लागले. पुन्हा काही सेकंदांनी त्यानी पुन्हा टाळी वाजवली. लोकांत कुजबूज सुरू झाली, "कमाल आहे! आपल्याला गप्प बसायला सांगून हा माणूस स्वतः टाळ्या वाजवतोय!!!"

अध्यक्षांनी हे ऎकले व ते म्हणाले, "तुम्हाला माहित आहे? माझ्या प्रत्येक टाळीवर आफ्रिकेत एका बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू होतो."

लोकांत पुन्हा शांतता पसरते. लोकांना आपले म्हणणे समजल्याचे मानून अध्यक्ष मनोमन सदोदीत होतात पण तोच गर्दीतून एक आवाज येतो, "तुझ्या टाळीवर मुलं मरतात तर मग टाळ्या वाजवणं बंद कर ना वेड्या!!! फुकट आम्हाला इथे का बोलावलंस?????"

************************

5. अमेरिकन माणसे आणि लग्न हा एक जागतिक विनोदात जिव्ह्याळ्याचा विषय आहे. असाच एक प्रयास...

एक अमेरिकन नवऱ्याचे आपल्या बायकोशी त्याच्या नशेबाजीवरून बरेच भांडण व्हायचे. एकदा बायकोने फर्मान काढले, "ह्यापुढे जर तू पुन्हा दारू पिऊन आलास तर मी तुझ्याशी घटस्फोट घेऊन तुझं पूर्ण घर मुलांसकट कॉंपन्सेशन मध्ये मागीन!"

घटस्फोट म्हणजे आता ह्या प्रकरणाने सिरीयस वळण घेतलं होतं, त्यामुळे भिऊन त्या नवऱ्याने काही दिवस दारूला स्पर्शही केला नव्हता. पण एकदा मित्रांच्या पार्टीत दारू झालीच. झिंगलेल्या अवस्थेत हा घरी परतला आणि दारावर रागवलेल्या बायकोने त्याचे स्वागत केले. तिचे वटारलेले डॊळे पाहून तिथेच तो शुद्ध हरपला.

सकाळ झाली. नवरा उठला. साहजिकच बाजूला बायको नव्हती. "सोडून गेली वाटते", हॅन्गओव्हर आणि त्याहूनही घटस्फोटाच्या विचारांनी नवऱ्याचे डोके भणाणून सोडले होते. तो बिचकत बिचकत बाथरूम मध्ये आला. बाथरूम घासून पुसून स्वच्छ केलेले होते. ऑर्किडच्या फुलांचा ताजा गुच्छ पूर्ण न्हाणीघरात सुगंध दरवळत होता. नवऱ्याची न्हाणीचप्पल, टॉवेल, कपडे सगळे कधी नव्हे ते इस्त्रीकरून ठेवलेले होते. नवरा कोड्यात पडला.

बाथरूम मधून आंघॊळ करून किचन मध्ये बेकफास्ट करायचा म्हणून जाऊन बघतो तर, ऍपल पाय, फ्रेन्च वाईन आणि उकडलेले अंड असा ह्याचा आवडता बेत होता. हा फक्त बायको नव्हती पण.

नवऱ्याने कोड्यात ब्रेकफास्ट खायला बसला तोच त्याची नजर मुलांच्या खोलीत गेली. ती तिथंच होती. "हिनं मुलांना इथेच ठेवलंय". अचानक त्याला काहीच कळेनासं झालं. तोच त्याला टेबलावर कागद दिसला.... त्याच्या बायकोच्या अक्षरातला.

"माझ्या स्विटीस, आज रात्री बीचसाईड डिनर आहे. होटेलात जायचंय. मी मुलांना माझ्या आईकडे ठेवीन. संध्याकाळी भेटूया."

ह्याला सातवं आकाश ठेगणं वाटू लागलं. पण हे सगळे काय चाल्लेय ह्याचा अजून अंदाज लागत नव्ह्ता. तोच त्याने त्याच्या मोठ्या मुलाला , ८ वर्षाच्या जॉनला बोलावलं.

"जॉन आई कुठे गेलीय?"

जॉन म्हणाला, "आई शॉपिंग करायला गेलीय. आजच्या रात्रीच्या डीनर साठी."

"शॉपिंग!!!", हे नविनच होतं. नवऱ्याला महित होतं कि हिचा मूड जेव्हा खूप चांगला असतो तेव्हाच ही शॉपिंग करते.

"तुला अन काल रात्री काय झालं माहित आहे?"

"मला नाही काही माहित. फक्त एवढंच की काल तुम्हाला बेडरूम मध्ये नेल्यावर मम्मी तुमचे कपडे काढत असताना तुम्ही ओरडत होतात... सोड सोड मला चांडाळे. माझ्या कपड्यांना हात लावू नकोस..............
...........
...........
मी विवाहित आहे!!!!"

*****************************

6. जपानचे प्रधानमंत्री मोर्री हे अमेरिकन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याशी चर्चा करायला शिकागोला जाणार होते. पण जाण्याधी दोन दिवस इंग्रजीचे प्राथमिक ज्ञान अवगत करून घ्यावे असे त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना सुचविले. मोर्रींनी ते मान्य केले व त्यासाठी टोकियोतील एका प्रथितयश इंग्रजी शिक्षकाला पाचारण करण्यात आले.

पहिल्या दिवशी त्या इंग्रजी शिक्षकाने मोर्रींना इंग्रजीत अभिवादन कसे करावे हे जपानीत शिकवले.

"श्री. मोर्री जेव्हा आपण अध्यक्ष क्लिंटनना भेटाल तेव्हा त्यांना अभिवादन करताना विचारायचे की ’हाऊ आर य़ु?’

त्यावर श्री. क्लिंटन विचारतील, ’आय एम फाईन ऍण्ड यु?’

त्यावर तुम्ही हसत म्हणा , ’मी टू. थॅंक य़ु!!’"

दोन दिवसाची इंग्रजी शिकवणी संपल्यावर शेवटी मोर्रींना शिकागोला जायचा योग येतो. तिथे विमानतळावर अध्यक्ष बिल क्लिंटन सपत्निक हजर असतात. विमानातून उतरून प्रथम मोर्री क्लिंटन्शी हस्तांदोलन करताना विचारतात, "हू आर यु?"

त्यावर गोंधळून क्लिंटन, मोर्रींनी गम्मत केली असल्याचे मानून, हसत म्हणतात, "आय एम हिलरीज हसबण्ड"

मोर्री त्यावर लगेच उत्तर देत्तात , "मी टु!!!!! हा हा हा..."

अन तेव्हा विमानतळावर शांतता पसरलेली असते.

******************************

7. जसे भारतीय विनोदात सरदार, ब्रिटीश विनोदात आयरीश तसे अमेरीकन विनोदात ब्लॉण्ड म्हणजे सोनेरी केसांच्या ललना. त्यांचाच एक जोक....

एक डॉक्टरकडे एक ब्लॉण्ड अंगदुखीची तक्रार घॆऊन येते.

डॉक्टर विचारतो, "हं बोला काय प्रॉब्लेम आहे?"
ब्लॉण्ड म्हणते, "डॉक्टर मी बोट लावेन तिथे दुखते मला"
डॉक्टर बुचकळ्यात पडून म्हणतो, "दाखवा!"
ती आधी खांद्याला बोट लावते, "ऊईईई!"" किंचाळते.
मग ढोपराला बोट लावते, "आई ग्ग!" ओरडते
मग नाकाला बोट लावते, "आऊच्च्च!!"
गुढघ्याला बोट लाऊन, "मेले मेले", म्हणून लोळते.

"बघा ना डॉक्टर सगळीकडे प्रचंड दुखते", ब्लॉण्ड त्रस्त चेहेऱ्याने म्हणते....

...... डॉक्टर ब्लॉण्ड नसतो, हुशार असतो. तो शांतपणे ब्लॉण्डच्या बोटाला प्लास्टर करतो!!!

*******************************

8. एक आंतरराष्ट्रीय जहाज प्रशांत महासागर बुडते पण त्यातून १५ लोकं वाचतात आणि निर्मनुष्य बेटांवर आश्रय घेतात... ते असे...

२ इटालियन पुरूष आणि एक इटालियन स्त्री,
२ फ्रेंच पुरूष आणि एक फ्रेंच स्त्री,
२ अमेरीकन पुरूष आणि एक अमेरीकन स्त्री
२ आयरीश पुरूष अन एक आयरीश स्त्री
२ भारतीय पुरूष अन एक भारतीय स्त्री.

आता त्यांना तिथे एक वर्ष झालंय. बघूया त्या बेटांतील घडमोडी...

एका इटालियन पुरूषाने आपल्या माफिया पिस्तुलीने दुसऱ्याचा खून करून इटालियन बाईशी संसार सुरू केलाय.

फ्रेन्च बाईने आपले हर्बल ब्युटी पार्लर उघडले आहे आणि दोघे फ्रेंच पुरूष एकमेकांशी लग्न करून सुखी आहेत (!!!!)

अमेरीकन बाईने पहिल्याशी तीनदा लग्न आणि घटस्फोट घॆऊन दुसऱ्याशी चवथ्यांदा लग्न केले आहे. तिला इटालियन पुरूषाकडून आधीच एक मूल झालंय!

आयरीश पुरुषांनी त्यांच्या बेटाचे दोन तुकडे केलेत उत्तर आयर्लॅण्ड आणि दक्षिण आयर्लॅण्ड नवाचे आणि दिवसरात्र मेहेनत करून आयरीश बाईने बनवलेली ताडी पिऊन ते त्या आयरीश बाईलाच विसरले आहेत.

आणि शेवटी आपले भारतीय मित्र....

अहो ते तर भारतीय बाईशी कुणीतरी आपली ओळख करून द्यावी म्हणून अजून वाट पाहतायत!!!!

*******************************

9.

म्हणतात स्वर्ग तिथे असतो जिथे ....

तुम्हाला अमेरीकन पगार असतो
तुम्हाला चायनिज जेवण मिळतं
तुमचं ब्रिटिश घर असतं
आणि तुमची बायको भारतीय असते.

पण नरक तिथे असतो जिथे

तुम्हाला ब्रिटिश जेवण मिळतं
तुमचं चायनिज घर असतं
तुम्हाला भारतीय पगार असतो
आणि बायको अमेरीकन मिळते!!!

*********************************

10.

एक अमेरीकन बायको आपल्या नवऱ्याकडे येऊन तक्रार करू लागली, "ह्या मुलांचं काय करू हेच कळत नाही"
नवरा विचारतो, "काय झालं?"
बायको म्हणते, "अहो प्रत्येक दिवशी माझी मुलं तुझ्या मुलांसोबत मिळून आपल्या मुलांना मारत असतात!!!!"

**********************************

11. पाश्चात्य विनोदात ज्यू म्हणजे भारतीय विनोदात गुजराती किंवा मारवाडी लोकं. हा एक ज्यू विनोद आहे.

एका गोल्फ कोर्समध्ये एक रोमन कॅथलिक प्रीस्ट, एक भारतीय डॉक्टर आणि एक ज्यू बिझिनेसमॅन मित्र गोल्फ खेळायला येतात. गोल्फ कोर्स मध्ये एकच कोर्ट फ्री असतो पण तिथे पाच दहा माणसं आधीच गोल्फ खेळत असतात. त्यामुळे हे तिघे त्यांचा कोर्स संपायची वाट पाहू लागतात. दीड तास उलटतो पण ह्यांचा डाव संपायचा पत्ताच नाही. वैतागून ते तिघे गोल्फ कोर्सच्या शोफरकडे तक्रार करतात, "आम्ही कधीपासून आमच्या डावाची वाट बघतोय पण आमच्या पुढचा ग्रुप एवढा संथ खेळतोय की आमचा वेळ अन धीर तुटत चाललाय. त्यांना त्यांचा खेळ लवकर संपवायला सांगाल का?"

त्यावर शोफर म्हणतो, "सर! तो ग्रुप आंधळ्या अग्निशामन दलाचा आहे. ह्याच लोकांनी आमच्या गोल्फ कोर्स मध्ये गेल्या वर्षी ह्याच दिवशी लागलेल्या आगीस विझवताना आपले डोळे गमावले होते. म्हणून त्यांना आम्ही आज इथे थॅन्क्सगिवींग म्हणून बोलावले आहे."

ते ऎकताच हे तिघे ओशाळातात.

कॅथलिक धर्मगुरू म्हणतो, "मी आजच चर्च मध्ये जाऊन त्या लोकांना दृष्टी मिळावी म्हणून प्रार्थना म्हणेन."
भारतीय डॉक्टर म्हणतो, "मी नेत्रचिकित्सकांशी चर्चा करून त्यांची फ्री आय-सर्जरी कुठे होऊ शकेल का ते पाहतो."
ज्यू मित्र ओशाळलेल्या स्वरात म्हणतो, "शोफर तुम्ही एक का करत नाही. त्यांना रात्री खेळायला बोलवा म्हणजे त्त्यांचा आणि आमचा वेळ आणि पैसा फुकट जायला नको. काय!!!!"

****************************

12. एक सामान्य वर्तमानपत्र एका अमेरीकन बाईला कसा प्रकारे सुखी करू शकते ह्याचा नमुना .....
वर्तमानपत्राच्या अग्रपानावर छापलेली तिच्या दहा वर्षाच्या चुणचुणीत मुलावर चित्रित कॉर्नफ्लेक्सची जाहिरात!
पेपराच्या बिझिनेस विशेषांकात तिची अठरा वर्षाची मुलगी यंग आर्थप्रुनर म्हणून घोषीत!
पेजत्रीवर स्वतःच्या बॉयफ्रेण्डचा टॉपलेस फोटो!
अन हरवलेल्यांच्या यादीत नवऱ्याचे नाव!

*****************************

13. पी.जे. सर्वत्र असतात ह्याला जपानी लोकं कशी अपवाद असतील?
जपानी लोकांचे इंग्रजीचे ज्ञान अगदी अभूतपूर्व असते, त्यातूनच उत्पन्न झालेला हा पी.जे.

एक जपानी माणूस अमेरीकेत काम करण्यासाठी येतो, आणि चांगले काम मिळावे यासाठी तो आपले इंग्रजी सुधारावे म्हणून इंग्लिश स्पिकींग कोर्स लावतो. तिथे त्याला कळते की इंग्रजी शब्दांचा डिक्शनरीतला अर्थ हाच त्यांचा शब्दशः अर्थ होय.

एकदा त्याला प्राणी संग्रहालयात काम मिळते. तिकडे इण्टरव्ह्यू घेणारा सिक्युरीटी गार्ड बर्गर खात त्याला चिनी समजून विचारतो, "तुला पाण्डा सांभाळायचा आहे. माहित आहे ना?"
हा पॉकेट डिक्शनरी ऊघडतो आणि त्यात पाण्डा शॊधतो. त्यात लिहिलेले असते,

पाण्डा - एक काळॆ पांढरे अस्वल, जे झाडाची पानं आणि मूळं खाते."

ते वाचून तो म्हणतो, "हो माहित आहे."
तरी इण्टर्व्हू घेणारा थोडा साशंकच असतो. म्हणून तो पुन्हा विचारतो, "बरं सांग बघू, पाण्डा काय करतो ते?"
त्यावर जपानी माणूस त्याच्या हातातला बर्गर हिसकावून खाऊन टाकतो, त्याची बंदूक स्वतःकडे खेचून हवेत चार बार ऊडवतो आणि तिथून निघून जातो!

इकडे सिक्युरीटी गार्ड त्याच्या ह्या वागण्याने घाबरून जाऊन इतर सिक्युरिटी गार्ड्सना बोलावतो, सगळे एकत्र जमून झालेल्या प्रकाराची चौकशी करत असतानाच हा जपानी परत येतो आणि त्याच सिक्युरीटी गार्डच्या समक्ष जाऊन स्मित देत उभा राहतो.

"तुझं डोकं बिकं फिरलंय काय?", गार्ड रागात किंचाळतो आणि जपानी माणसाला दंडाने पकडून बेड्या ठोकतो, "एक तर माझा बर्गर खाल्लास, त्यात माझ्याच बंदुकीने हवेत गोळीबार करून ऊर्मटपणे निघून गेलास अणि आता माझ्या समोर परत येऊन हसतोयस?"
जपानी म्हणाला, "पण, पण, मी तर तुम्हाला पाण्डा काय करतो ते दाखवत होतो!!"
गार्ड पुन्हा किंचाळतो, "खोटं बोलू नकोस!"
जपानी घाबरून म्हणतो, "नाही खरंच, पॉकेट डिक्श्नरीत हेच लिहिलेय!!"
म्हणून गार्ड त्याच्या खिशातली डिक्श्नरी उघडून त्यात पाण्डा शोधतो. त्यात लिहिलेले असते ....

Panda - a black and white bear that eats shoots and leaves

******************************

13.
शीतयुद्धाच्या काळात अमेरीका आणि रशिया यांत आणखी एक युद्ध चालू होते अन ते म्हणजे, अंतराळ आणि तंत्रज्ञान संशोधन. ह्यातच अमेरीकनांना एक गरज येऊन पडली. ती म्हणजे अंतराळात जेव्हा अंतराळवीर लिहिण्यासाठी फाऊण्टन अथवा बॉल पेन वापरत त्यातली शाई गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे शाईच्या नीपेतून बाहेर येत नसे त्यामूळे प्रत्येक लिखाण नासात बसलेल्या आपल्या मित्रांतर्फे रेडियोप्रक्षेपणाद्वारे बोलून होत असे. ह्यावर उपाय म्हणून जे वजा १०० ते अधिक २००० डिग्री सेल्सियसच्या तपमानात आणि त्याहीपेक्षा गुरूत्त्वाकर्षाणच्या अभावी लिहू शकेल, ज्याची शाई ही सर्व प्रसंगात लिहून पुसता येईल आणि जे पुन्हा पुन्हा शाई भरायच्या कटकटी विना चालेल अशा पेनाचे संशोधन करण्यासाठी २ मिलियन अमेरीकन डॉलर्स चा ठराव अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर करण्यात आला.

ठरावानुसार पेनाचे संशोधन सहा महिन्यात आटोपायचे होते. पण शेवटी असे पेन जमून यायला दोन वर्ष आणि तब्बल ८ मिलियन डॉलर्स खर्च झाले. पण असे पेन बनले गेले आणि आपण रशियन लोकांची कशी जिरवली ह्या गर्वात अमेरीकन संशोधकांनी ह्या पेनाचे पेटंट मिळावे म्हणून "अंतराळात लिहिणासाठीचे साहित्य" म्हणून जागतिक पेटंट संस्थेकडे अर्ज केला. पण त्या संस्थेने तो अर्ज नामंजूर करत रशियाने आधीच ह्यात पेटंट मिळवल्याचे सांगून अमेरीकन शास्त्रज्ञांना धक्का दिला. हे पेटंट दीड वर्षे आधीच मिळवण्यात आले होते. "असे कुठले पेन रशियाने बनवले आहे?", असे म्हणून जेव्हा अमेरीकन शास्त्रज्ञांनी त्या संस्थेकडे पृच्छा केली तेव्हा ........

.....त्यांना पेन्सिल देण्यात आली.

****************************

14. एक अमेरिकन दंपती लग्न करून आपल्या नव्या घरी येते. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा आपल्या बायकोला एक लाल पेटी दाखवतो अन म्हणतो, "लग्न केल्यावर बायको आणि नवऱ्याने एकमेकांवर विश्वास ठेवायचा असतो. जर तू माझ्यावर विश्वास ठेवत असशील तर कधीही ही पेटी उघडू नकोस. प्रॉमिस मी! जर तू ही पेटी उघडलीस तर घटस्फोटाची पाळी येईल!!"
"आय प्रॉमिस!", बायको म्हणते.
वर्षांमागून वर्षे सरतात, त्याच्या बायकोला अनेकदा ती पेटी उघडायचा मोह होतो. पण घटस्फोटाचे ऎकून ती कधी हिंमत करीत नाही. शेवटी त्यांच्या लग्नाला ४० वर्षे होतात. आता एवढी वर्षे झाल्यावर कसला होणारये घटस्फोट म्हणून बायको धीर एकवटून ती पेटी उघडतेच. त्यात बियरच्या तीन बाटल्या आणि १२० डॉलर ठेवलेले असतात.
"४० वर्षांचं गुपित हे!", बायको गोंधळात पडते अन गुपचुप पेटी पुन्हा बंद करून ठेवून देते.
पण "क्युरियॉसिटी किल्स द कॅट" ह्या म्हणीप्रमाणे तिला रहावत नाही आणि शेवटी ती त्या रात्री नवऱ्याला विचारतेच,
"हनी! मी किनई आज ती लाल पेटी उघडली."
नवरा हताश होतो अन म्हणतो, "म्हणजे तुला सगळं कळलं तर!"
बायको विचारते, "कळलं म्हणजे त्यात तीन बियरच्या बाटल्या अन १२० डॉलर होते एवढंच. मला त्यांतली गोम अजून कळत नाहीये. सांगना स्वीटी!"
नवरा म्हणतो, "सांगतो! प्रत्येक बाटली ही मी लग्नानंतर जेव्हा अफेयर केलंय त्याची आठवण आहे!"
बायकोस शॉक बसतो ती रागावते पण नंतर राग आवरून म्हणते, "४० वर्षांचं लग्न आणि तीन अफेयर्स. नॉट बॅड! मोह सगळ्यांनाच होतो, जाऊदे. झालं ते विसरून नव्या आयुष्याची सुरूवात करूया. तू प्रामाणिकपणे कबूल केलंस हेच माझ्यासाठी भरपूर आहे."
आणि असं म्हणून ती नवऱ्याल कवेत घेते अन पुढे विचारते, "मग त्या १२० डॉलर्सचं काय?"
नवरा शांतपणे म्हणतो, "ते भंगारात विकलेल्या बाटल्यांचे!!!"

*****************************

15. दहा पुरूष अन एक स्त्री अशा अकरा अमेरिकन लोकांना कतरीनाच्या वादळातून सोडवायला एक हॅलिकॉप्टर येते. हॅलिकॉप्टरमधून खाली सोडलेल्या दोरीने सगळे एकत्र लटकतात. हॅलिकॉप्टर उडू लागते पण वजन जास्त झाल्याने आणि तेव्हाच सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने हॅलिकॉप्टरचा तोल बिघडतो.

हॅलिकॉप्टरचा पायलट त्या सगळ्यांना म्हणतो की पाच सहा लोकांनी दोर सोडावे म्हणजे भार कमी झाला की त्याला हॅलिकॉप्टर नीट चालवता येईल अन तो काही वेळातच दोरीशी लटकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी सोडून आल्यावर पुन्हा एक फेरी मारेल.

पण त्या अकरा लोकांपैकी कुणीही, एव्हाना वीस फुटांवर पोहोचलेल्या त्या हॅलिकॉप्टरमधला दोर सोडायला तयार होत नाही. शेवटी त्या अकरा लोकांपैकी असलेली ती अमेरिकन स्त्री भावनाविवश होऊन म्हणते, "मी एक स्त्री आहे. स्त्री म्हणजे साक्षात बलिदान, त्याग, परमार्थ. मी हा दोर सोडायला तयार आहे. स्त्री नेहेमी पुरूषांसाठी त्याग करते. कधी मुलगी होऊन, कधी बहिण होऊन, बायको म्हणून तर कधी आई म्हणून. म्हणूनच माझ्या बंधूंनो मी हा दोर सोडायला तयार आहे! आदियोस!"

तिच्या ह्या संवेदनशील भाषणांती, रडवेले झालेले इतर अमेरिकन पुरूष टाळ्या वाजवतात!!!!

****************************

16. कन्जूस ज्यू :

चार मित्रान्पैकी एक ब्रिटिश, एक अमेरिकन, एक फ्रेन्च अणि एक ज्यू. खूप वर्षे मित्र असतात ते.

व्रुद्धापकाळामुळे ब्रिटिश माणूस निधन पावतो. आपल्या जिवलग मित्राच्या अन्त्यसन्स्काराला हे तिघे येतात.

अमेरिकन माणोस त्याच्या शवपेटिकेत १०० डॉलर्सची नोट टाकतो....
फ्रेन्च माणूस आपल्याकडचे १००० डॉलर्स त्यात टाकतो.....

ज्यू पुढे येतो. ११०० डॉलर्स उचलतो आणि २५००० डॉलर्सचा चेक टाकतो....

**************************

No comments: