Sunday, 2 August 2009

गॅरीची गोष्ट

ही कथा मी काही वर्षांपूर्वी माझ्या लहान बहिणीने आग्रह केल्याने तिच्या शालेय मासिकासाठी लिहिली होती. प्रख्यात विज्ञानकथा लेखक सर आर्थर सी क्लार्क यांचे नुकतेच देहावसान झाले. त्यांच्या आठवणीप्रित्यर्थ मी ही कथा प्रस्तुत करीत आहे. तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा.

गॅरीची गोष्ट

खूप खूप वर्षांनंतरचीही गोष्ट.

आज गॅरीचा दहावा वाढदिवस. कॉन्टीनेन्ट थ्री हंड्रेड फिफ्टी टू, सिग्मा सेवेन, मराठा कॉसमॉस मध्ये असलेलं ‘कुलकर्णी सदन’, सर्वांनी सकाळी उठण्याआधीच सुलेखाने बर्थडे साठी सजवून टाकलेलं होतं. आईने तो टायमर कालच तिच्यात सेट केलेला. ‘आईकडून आपल्याला बर्थडेचं कसलंतरी सप्राईझ मिळणार आहे’, हे गॅरीला आधीच ठाऊक झालेलं. पण गिफ्टच्या आशेने हावऱ्या झालेल्या गॅरीनं अगदीच न रहावून त्याच्या झुरळ रोबोत स्निकोस्कोप लावून, सर्वांच्या नकळत आई आणि आजीच्या बाता ऎकल्या. त्यासाठी त्याने त्या झुरळाला सुलेखाच्या हजेरीत रीमोट-कंट्रोलने किचन मध्ये घुसवून त्याचं बलिदान दिलं.

"गाजर हलवा!"

आई आजीच्या बोलण्यातला हा शब्द त्याने ऎकला आणि सर्प्राइझ फुटलं. तेव्हापासूनच गॅरीच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. पोटात कावळे कोकलू लागले होते. गॅरीने आनंदात रिमोटचं "फ्लाय" हे बटन दाबलं अन झुरळ एका कोपऱ्यातून उडून तडक सुलेखाच्याच डोक्यावर जाऊन बसलं. सुरेखाने आपल्या ऍण्टेनांनी डोक्यावर असलेल्या त्या दुसऱ्या रोबोटचा ठाव घेतला अन चपळाईने पकडून ते फराट्याने टॉयलेटमध्ये फ्लशही करून टाकलं.

झुरळाचा निकाल लावल्याचं कळलं तसं "जास्त पैसे मोजून वॉटर प्रूफ झुरळं घ्यायला हवी होती’, अशी खंत गॅरीनं मनातल्या मनातच बोलून दाखवली.

सुलेखाला आपल्याशिवाय इतर कुठलाही रोबोट कुलकर्णी सदनात आवडत नसे. आता ती स्वतः लेवल १०० एआय (आर्टीफिशीयली इंटलिजन्ट) रोबोट असूनही, लेवल ५ पेक्षा जास्त असलेल्या गॅरीच्या साऱ्या रोबोट खेळण्यांवर तिची करडी नजर असायची. मामाने गेल्या बर्थडेला गॅरीला शंभर रोबोट झुरळं आणलेली. त्यातली आता जेमतेम पाच उरली असतील. त्या सर्वं पंच्याण्यव झुरळांचा निकाल लावणाऱ्या सुलेखाने आज आणखी एकाचं काम फत्ते केलं होतं.

पण झुरळ मरो वा सुलेखा जळो. त्याने गॅरीला काहीच फरक नव्हता. गाजर हलवा हा एकच शब्द त्याला मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटण्यास पुरेसा होता. गॅरी सकाळी सातला उठला.

पंचवीस तासांचा दिवस असलेल्या मंगळ ग्रहावर गॅरीने स्वतःहून सात वाजता उठणे हे म्हणजे तो दिवस कुलकर्णी फॅमिलीच्या डायरीत पाचशे साईझच्या गोल्डन बोल्ड फॉण्ट्स मध्ये टाईप करून ठेवण्यासारखा होता. एरवी गॅरीची उठण्याची वेळ नऊची होती.

"गाजर हलवा! गाजर हलवा!! आय वॉन्ट गाजर हलवा...", गॅरी मनातल्या मनातच घोषणा देत पायऱ्यांवरून सर्रकन उतरला तशी पायऱ्यांच्या पायथ्याशी असलेली फ्लॅक्सोची गच्चं पानं एकसुरात हलली. गॅरीची ही तुफान मेल किचनमध्ये वळली.

"वेट!!", कुणीतरी यांत्रिकपणे ओरडलं. गॅरी दाराशीच थांबला. अचानक समोर उभी सुलेखा कुठून आली हे गॅरीला कळलेच नाही. गॅरीनं तिला खोटं खोटं हसून दाखवलं. अर्थातच त्याच्या हसण्याने सुलेखाच्या तोंडावरची माशीही हलणार नव्हती.

"जर्म्स वॉर्निंग! जर्म्स वॉर्निंग!! किचनमध्ये येण्या आधी हात, कान, नाक, नखं, केस, दात इत्यादींची तपासणी सक्तीची करण्यात आलेली आहे....", सुलेखाने म्हटले तसे गॅरीनं हिरमुसून आईकडे पाहिलं, ".... हुकुमावरून.", सुलेखाने आईचा हुकुम सोडला.

गॅरीचं तोंड उघडंच राहिलं होतं. आज बर्थडेच्या दिवशी तरी आईने जर्म्सचेकची सेटींग ऑफ ठवली असेल असं त्याला वाटलेलं. पण आजही तेच.

"पण... पण...", गॅरीचं काहीही न ऎकता सुलेखाने त्याला आपल्या बळकट स्टीलच्या हातांनी पकडून तपासणं सुरू केलेलं. हात खेचून, पाय फाकवून, शर्टात डोळे खुपसून, नाकपुड्यांत भिंगाने बघत तिनं गॅरीचं अंग-न-अंग तपासलं. गॅरीने स्वतःला तिच्या तावडीतून सोडवायचा निष्फळ प्रयत्न केला पण ती मानली नव्हती. तिला जीभ दाखवणंच तेवढं गॅरीच्या हाती उरलेलं.

आता तिही चेक करायची होतीच.

एकदा चेकींग झाली. पण सुलेखा मानली नाही. तिच्याकडून दोनदा चेकिंग करण्यात आलं. पण तरीही तिला कळेनासे झाले होते. कारण सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्याजोगी आणखी एक गोष्ट आज झाली होती. गॅरीने अगदी स्वच्छ आंघोळ केलेली. "बर्थडे ला तरी स्वच्छ आंघॊळ करावी" असा सुविचार सुदैवाने त्याच्या मनात आला. त्याने डेटॉलच्या पाण्यांत अर्धा तास बसून जर्म्सकिलींग स्पंजने घासून घासून स्वतःला साफ केलेलं. सुलेखच्या तपासणीनेही जवळ जवळ तेवढाच वेळ घेतलाच. गॅरी स्वच्छ असणे ही कल्पनाच तिला पटेनाशी होती. तिनं तिसऱ्यांदा रीचेकींग सुरू केलं पण काहीच मजबूत पुरावा न सापडल्याने रागाने धुमसत तिनं बेंबी आणि नाकाला रेड कार्ड दाखवून गॅरीला किचनमध्ये जाऊ द्यायची मुभा दिली.

त्या दोन बाबी सोडून बाकी सगळ्या गोष्टी तपासणीत तरल्या.

"अगं बाई!", आजी जवळजवळ ओरडलीच, "आज तू सकाळी सकाळी इथे कुठे?"
"मला आजचं सप्राईझ बघायचंय होतं." गॅरीने आजीला दात दाखवत म्हटले.
"हॅपी बर्थडे बेटा...", आईनं गॅरीला मुका घेतला, "पण थांबला असतास ना..."
"नाही!", आईचं वाक्यंही पूर्ण होऊ न देत गॅरीने आईला म्हटले, "मला गाजर हलवा कसा करतात ते बघायचं होतं. फ्रोझन हलवा खाऊन खाऊन कंटाळलो मी. आज तू स्वतःहून गाजर हलवा करणार हे ऎकूनच मला रहावलं गेलं नाही..."
आईने आ वासला होता, "तुला कसं कळलं हलव्याविषयी?". तिच्या चेहेऱ्यावर संशय दाटला.
गॅरीने दातांखाली जीभ दाबली. त्याच्या झुरळाबद्दल सुलेखाने आईला चोमडेपणा केला नव्हता म्हणून नशिब. गॅरीला कधी नव्हे ते सुलेखाबद्दल आपुलकी वाटली.
"कळलं कसं तरी", गॅरीने नजर चुकवत बघून म्हटले, "आई दाखव ना गं... मल गाजर बघायाचेत."

गॅरीचा हा हट़्ट आई आणि आजी जास्त वेळ रोखून धरू शकल्या नाहीत. शेवटी आईने ते लांबट लालेलाल गाजर फ्रिजमधून बाहेर काढले.

तब्बल एक फूट लांब. चिकन सॉसेजेस पेक्षा दुप्पट जाड. एकदम चकचकीत लाल. टिव्हीवर बग्स बन्नीला शेतातले गाजर चोरून खाताना पाहताना गॅरीला गाजरांविषयी वाटणारं आकर्षण आज पूर्ण झालं होतं. प्रत्यक्षात तेच शेतातले गाजर बघायला मिळाले होते. खुद्द जमिनीतून काढलेले. कोवळे रसरशीत गाजर.

गॅरीच्या डोळ्यांतली चमक पाहून आजी आणि आई हसल्या.
"काय मग पाहिलेस शेवटी गाजर?"
"हो! दे लूक यम्मी!", गॅरीने आपली लाळ पाघळत म्हटलं, "कुठून आणले?"
"युरोपा ग्रहावरून!", पाठून बाबांचा आवाज आला, "तिथे मोठ्ठी हरितगृहे आहेत अशा गाजरांची. तुझ्या आईला माहित असेल."
बाबांनी आईकडे थोड्या मिश्किलीत बघत पुढे म्हटलं.
"आता तुझ्या आईलाच फ्रोझन फूड आवडत नाही. आमच्या लग्नातही तिच्याच हट़्टापायी ह्याच ऑरगॅनिक गाजरांचा हलवा मेनूत ठेवला होता आम्ही."
आईने लटक्या रागात नाक मुरडलं, "ऑरगॅनिक आहे म्हणूनच. सतत फ्रोझन आणि प्रिझर्व्ड अन्न खाऊन हवी तेवढी पोषक मूल्यं मिळत नाहीत. म्हणूनच आज ठरवलं. शेतातले गाजर खायचे."
"मान्य आहे पण ह्या डझन गाजरांच्या किमतीत शंभर डझन फ्रोझन गाजर मिळाले असते.", बाबांनी हिशेब मांडायला सुरूवात केली तसं आजीनेच, "काही गोष्टी पैशांत मोजल्या जात नाहीत." असं म्हटलं.
"मान्य आहे. पण तरी...."

"हे बघ ते जाऊदे. तू इथून निघ बघू. नाहीतरी सुलेखाच्या आठ्या पडल्यात सगळ्यांना किचन मध्ये घुसलेलं पाहून...", आजीने म्हटलं तसं बाबा थोडे ओशाळले, "हो हो मी जातो... किचन म्हणजे तिची टेरीटरी आहे. एवढी लोकं एकत्र आलेली बघून तिच्या जर्म्सचेकची दाणादाण उडाली असेल", बाबांनी गॅरीला डोळा मिचकावून कुजबूजत म्हटलं आणि ते दिवाणखान्यात निघून गेले.

गॅरीनं कशीबशी ओघळून पाघळणारी आपली लाळ तोंडातल्या तोंडात सावरली होती. खमंग देशी तूपाचा वास, कढईत तडतडणारे काजू, बदाम, बेदाणे, मनुके. वेलचीचा सुगंध अन त्यात विरघळणारं किसलेलं गाजर. तरी ते बनवताना काही चूक होऊ नये म्हणून आईने सुलेखामध्येच गाजर हलव्याची रेसेपी लोड केली होती. तिलाच हलवा बनवायला सांगितला होता.

आजीने "अगं तिला कशाला? मी करते" असं म्हणून स्वतःची मदत प्रस्तुत केलेली. पण आजीलाही गाजर हलवा बनवून जवळजवळ वीस वर्षं लोटली असावीत. तिला आठवेल न आठवेल. म्हणून कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता आईने सुलेखाकडूनच रेसेपी बनवून घेतली.
"आता हा रोबोट गाजर हलवा काय बनवणार?", अशी आजीच्या मनातली नाराजी तिच्याही चेहेऱ्यावर साचली होतीच.

दहा मिनिटांनी हलवा बनला आणि गॅरीने आपली डिश मांडली.

"अहं! इथे नाही.", सुलेखाने आपले डॊळे फाकले, "किचन मध्ये खायचं नाही. डायनिंग टेबलावर चला..."
गॅरीने तिला पुन्हा चिडवून दाखवले. पण सुलेखाच्या फाकलेल्या डॊळ्यांतून तिची स्टीलची खोबणी दिसू लागल्यावर मात्र गॅरी गप्प बसला. त्या आवेशात सुलेखाने जर जीभ ओकली तर तिनं अगदी चंडीचं रूप घेतलं असतं. गॅरीला त्या विचाराने थोडी मौज वाटली.

सगळे डायनिंग वर जमले. आईनं सर्वांना हलवा वाढला.
गॅरीने गरमागरम हलव्याने चमचा भरला आणि तो तोंडात नेणार तोच आजीनं त्याला फटकारलं.

"गिरिऽऽऽश! प्रार्थना!!"

गॅरी हिरमुसला. ही नाराजी आजीने प्रार्थना म्हणायला सांगितलेलं म्हणून केवळ नव्हती पण तिनं त्याला ‘गिरीश’ म्हटलेलं ह्यासाठी तो राग होता.
"वदनी कवळ घेता..." झाल्यावर अन्न देणाऱ्या पृथ्वीची दोन मिनिटांची आठवण काढून मगच घास घ्यायचा असा कुलकर्णी सदनातला प्रघात होता. गॅरीला ते कंटाळवाणे वाटत असे. त्यात समोर बशीत वाढलेला गाजर हलवा पाहून तर आणखीनच.

प्रार्थना संपली एकदाची आणि सगळे मिटक्या मारत हलवा खाऊ लागले.
"काय मग गिरिश आवडला का हलवा?"

"हो गं पण ...", आजीने विचारलं तसं गॅरीने त्रासिक चेहेरा करून म्हटलं, "मी कित्ती वेळा सांगितलंय की मला गिरिश नको म्हणत जाऊस. माझे मित्र मला गॅरी म्हणतात. तेच म्हणत जा."
"अरे! गिरिशमध्ये न आवडण्यासारखं काय आहे?", आता बाबांनी आठ्या पाडल्या, "गिरिश म्हणजे पर्वतांचा राजा. गिरीश म्हणजे हिमालय. पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत. भारत आणि भारतीयांचे भूषण आहे तो..."
"माहितिये मला माझ्या नावाचा अर्थ आणि म्हणूनच मला नकोय ते नाव."
गिरिशने असे म्हटले तसे आई आणि आजी कोड्यातच त्याच्याकडे पाहू लागल्या.
"का? का आवडत नाही तुला तुझ्या नावाचा अर्थ?"

सगळेच चहूबाजूनी प्रश्न विचारायला लागल्याने गॅरीचा हलव्याचा मूड मावळला.

"ओके. सांगतो.", गॅरीने शेवटचा घास संपवला आणि आईला म्हटले, "गेल्या वेळी आमची एज्युकेशन ट्रिप सायन्ससेंटरमध्ये गेलेली. तिथे आम्ही स्लाईड शो मध्ये उपग्रहांद्वारे काढलेली पृथ्वीची चित्र पाहिली. त्यात तो पर्वतही दिसला. तुम्ही म्हणताय तो हिमालय.... श्शी!... करड्या पृथ्वीवरचा चिवट घाणीने भरलेला काळाकुट़्ट हिमालय पर्वत ... याक्क! टिचर तर म्हणत होती तिथे श्वासही घेता येत नाही इतके विषारी वायू पसरेलेले असतात. शिवाय सतत ऍसिड रेन्स असतं ते अलगच. अजिबात लाईफ दिसत नव्हती. म्हणूनच मला गिरिश नाव आवडत नाही. अशा डेड गार्बेज ग्राउन्ड हिमालयचं नाव हवंय कुणाला?"

गॅरीच्या ह्या अनपेक्षित उद्गारांवर आजी आणि आईने थोडं शरमूनच बाबांकडे पाहिलं. त्यांच्या चेहेऱ्यात नाराजीची छटा बाबांना दिसली. बाबाही स्वतः थोडे रागावलेलेच होते गॅरीवर. पण आजच्या दिवशी गॅरीला ओरडणे चांगले दिसत नव्हते म्हणून त्यांनी सर्वांनी गप्पपणे आपापल्या डिशमधला हलवा संपवला.

"हलवा सही होता...", गॅरीने डिशमधलं उरलेलं लाल उष्टं चमच्याने चाटलं, "आई पुन्हा जरूर कर ... आणि युरोपावरची गाजरंच आण पुढल्या खेपेस. ‘महाग आहेत’, म्हणून बाबा नाही म्हणत असतील असतील तर मी माझा पॉकेट मनी देईन तुला."

गॅरीने असं म्हणून आईकडे दिमाखात पाहिलं. पण आईनं प्रतिसाद दिला नाही. आजी आणि बाबाही गप्प होते. आजी आई बाबांचा मूड गेलाय हे गॅरीला थोडं ऊशीराच ध्यानात आलं. पण ‘मी जे म्हटलंय ते खरंच म्हटलंय आणि मी सॉरी बोलणार नाही’, त्याने मनात चंग बांधला.

गाजर हलवा संपला आणि गॅरी त्याच्या रूममध्ये निघून गेला. दिवाणखान्यात बसलेल्या बाबा आई आणि आजीने एकमेकांकडे बघत, काहीतरी संगनमताने ठरवलं.

"गिरीश!", बाबांनी गॅरीला हाक मारली.

"बाबा गिरीश नाही. इट्स गॅरी!", गॅरीनं मागे न बघतच म्हटले. आपला वर्च्युअल रियालिटी गेमिंग कंसोल त्याने आपल्या डॊळ्यांना जोडलेला. हातात एलेक्ट्रॉनिक ग्राविटी स्टिक होती. एकूण उभ्या राहण्याच्या स्टाईल वरून तो टेनिस खेळत होता असे वाटत होते.
"मला माहितिये तुझं पेट नेम ‘गॅरी’ आहे ते. त्याच्याविषयीच बोलण्यासाठी मी इथं आलो होतो."
"त्यात बोलायचंय काय बाबा? मला गिरीश नाव आवडत नाही."
"पण बेटा आपलं नाव न आवडणं म्हणजे आपल्या आई, बाबांच्या भावनांचा अनादर करणं. नाही का?"
"पण तुम्ही असं ओल्ड फॅशन्ड नाव का ठेवलंत माझं?", गॅरीनं त्याचा आयपिस डोळ्यांवरून काढला, "मला लाज वाटते माझ्या नावाची. बाकी मुलांची नावं किती मॉडर्न आहेत. बाकीच्यांची जाऊदेत पण तुमचंच नाव ‘आनंद’ माझ्यापेक्षा कितीतरी बरंय. "
"हे बघ गिरीश. माझं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं आणि तुझं तुझ्या आजोबांनी. त्यांच्या अंतिम इच्छेनुसारच आम्ही तुझं नाव गिरीश ठेवलंय. त्याच नावाला नावं ठेवून तू त्यांचीही मर्जी मोडतोयस."

आजोबांचा उल्लेख झाल्याने गॅरी पुन्हा गप्प बसला. त्याला पुढे काहीही बोलता आलं नाही. त्याला गप्प बसलेला पाहून बाबांनी त्याच्या हातातली ग्राविटी स्टीक घेतली आणि बिछान्यावर टाकली.

"चल. लेट्स गो. माझ्याबरोबर चल."
"कुठे?"
"सायन्स सेंटरला."
"व्हॉट़्ट? सायन्स सेंटर!", गॅरीला कळलंच नाही, " पण का?"
"तुला एक गोष्ट दाखवायचीय."
"पण पण ... बाबा माझा गेम?"
"हे जास्त महत्त्वाचं आहे."
"बट डॅड इट्स संडे ऍन्ड इट्स माय बर्थडे!", गॅरी कुरकुरला तसं बाबांनी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं.
"प्लीज गॅरी. आज चल. हे बघ आजनंतर तुला हवं तू तुझं नाव गॅरी ठेवू शकतोस. मी, आई किंवा आजी तुला जबरदस्ती करणार नाही. फक्त आज ऎक माझं."

गॅरीच्या आठ्या तश्श्याच होत्या. संडे आणि तेही बर्थडेच्या दिवशी सायन्स सेंटरला जायचं हा विचारच महाबोरींग होता. ऍब्सोल्यूट वेस्ट ऑफ टाईम!

"पण.."
"आपल्या प्लोटर कार ने जाऊ.", बाबांनी म्हटले.

‘प्लोटर कार!’, मावळलेल्या मूडमध्येही गॅरी थोडा उत्साहित झाला. बाबांनी विनंती केल्यानं जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आई आणि आजी येत नव्हत्या.

सायन्स सेंटर दोनशे किमी वर असलं तरी सुपरसॉनिक फ्लोटर कार ने जायचं असल्याने तिथं पोचायचा मामला जास्तीत जास्त दहा मिनिटांचा होता.

फ्लोटर कार गॅरीला आवडायची. एरवी बाबा ती कार ऑफिसला जाण्यासाठी वापरत. त्यामुळे तिच्यातून प्रवास करायचा प्रसंग गॅरीला खचितच एखाद दुसऱ्या वीकेन्डला येत असे. बाबांच्या फ्लोटर कारच्या तुलनेत मिनिटागणिक पाच किमी वेगानं चालणारी गॅरीची शाळेची एयरबस म्हणजे जणू चित्त्याच्या तुलनेत गोगलगाय. जमिनीला स्पर्श न करता मंगळ ग्रहाच्या जमिनितलं चुंबकीय बल कारच्या अधराखाली बरोबर एकत्रित करून विरूद्ध चुंबकीय बलाने हवेतच तरंगणारी फ्लोटर कार तिच्यातल्या न्युक्लियर इंजिनामधून मिळणाऱ्या सुपरसॉनिक गतीसाठी प्रसिद्ध होती. त्यामुळे ह्या हायपरफास्ट फ्लोटर कारने जायचं हेच काय ते गॅरीला अवसान होतं.

पण दहा मिनिटांची ही क्षणभंगुर मजा आटोपली आणि ते सायन्स सेंटरला पोहोचले. तिथं पोहोचाल्यावर बाबांनी "पृथ्वीचा शोक" ह्या शोची दोन तिकिटं विकत घेतली. नावावरूनच महाबोरींग वाटणारा हा शो मागल्या खेपेस स्कूल विझीटवर आलेल्या गॅरीनं बुडवला होता. त्याच्या ऎवजी तॊ "ऍस्ट्रोनॉट फॉर ऍन आर" च्या शोमध्ये गेलेला. एका तासासाठी अंतराळवीर होण्याचा भास निर्माण करणारा तो शो गॅरीला कोण्या फुटकळ पृथ्वीविषयी जाणून घेण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा वाटला होता. वर्च्युअल असूनही "ऍस्ट्रोनॉट शोच्या दोन तास आधी काहीही खाऊन येऊ नये" अशी सक्त ताकिद दुर्लक्षित करून पिझ्झाचा शेवटचा तुकडा तोंडात कोंबत गॅरी आणि त्याची मित्रमंडळी त्या शोला गेली आणि पोटातली मळमळ चेहेऱ्यावर आणि गुरूत्त्वाकर्षणाच्या महाबलामुळे लटपटलेले हातपाय घेऊन तासाभरात परतली. घरी गेल्यावरही तब्बल तीन चार दिवस पोट बिघडल्याने आणि हात पाय गळाल्याने गॅरी शाळा बुडवून घरी राहिला होता. त्याच्या मित्रांचीही तिच गत झाली होती.

गॅरीला पृथ्वीविषयी भलताच तिटकारा होता. तिच्याविषयीच्या ह्या शोपेक्षा ऍस्ट्रोनॉट शो केव्हाही बरा असेच त्याला वाटत होते. कांकू करीत तो आत शिरला. बाबांनी त्याला प्रथम आत जाऊ दिले.

आत सगळा अंधार होता. शिरल्या शिरल्या आला कुबट वास. घाण वास. नाकातले केस जाळवणारा. गॅरीला अचानक गुदमरल्यासारखे वाटले. अचानक अंगाची लाहीलाही करणारी आग पायांखालून उमटली आणि खोकत खोकत तो बाबांना शोधू लागला. बाबा मागे होते. त्यांनी चेहेऱ्यावर मास्क चढवला होता. तिकिटासोबत मिळालेल्या दोन मास्क्स्पैकी एक त्यांनी गॅरीला दिला. गॅरीने तो ताबडतोब आपल्या तोंडावर चढवला. त्यातला ऑक्सिजन चटकन जीव शांत करून गेला.

त्यात मला साथ मिळाली धूमकेतूंची. त्यांनी आपल्या अंतरीचे क्लिष्ट रेणू माझ्यावर शिंपडले. मी त्या रेणूंना माझ्या उदरात घेतलं. त्यांचा उद्धार केला. अन शेवटी डीएनए बनला गेला. ह्या रेणूला स्वतःची अशी एक शैली होती. तो वीज, पाणी, उष्मा सारख्या सोप्या माधम्यांतून ऊर्जा मिळवत स्वतःची नकल बनवी. काही नकला टिकू शकत नसत. पण काही नकला वेळेनुसार जास्त प्रभावी बनल्या. फॉस्फोलिपीड्स नी पाण्याशी संयुगं बनवून ह्या प्रभावी डीएनएला आपल्यात लपवलं. तिथंच तो डिएनए रेणू त्या अतिसूक्ष्म पिशवीत निपजला. मी जिवंत व्ह्यायच्या ध्यासाने पार वेडावले होते. पण नेहेमीप्रमाणे मी सबूरीनं घेतलंच. अन एके दिवशी ...", पृथ्वी गहिवरली, " एके दिवशी माझी कूस उजवली गेली... "

आवाज थांबला आणि समोर दृष्यमान झाला एक सूक्ष्म एकपेशिय अमीबा. माझा प्रथमाविष्कार.

" मी आनंदित झाले होते... विजेवर वीजा पाडून आपल्या मनातला हर्षोल्हास साऱ्या विश्वाला ओरडून सांगत होते... मी जिवंत आहे... मी जिवंत आहे... हळूहळू माझ्या आनंदाला सुखाचं कोंदण लाभत गेलं. बहूपेशीय जीव बनले गेले. सूर्यापासून ऊर्जा घेऊन अन्न बनवणारा क्लोरोप्लास्ट बनवून मी पहिली वनस्पती बनली. मी तिला आपलंसं केलं. माझ्या अंगावर तिला वाढवलं. माझ्या ह्या प्रथम अपत्यास मी माझं अंग-न-अंग देऊ केलं. झाडं बनली. वृक्ष बनले. त्यांनी मला चहूबाजूंनी आपल्या कवेत घेतलं होतं. माझ्या निळ्या अंगाला हिरवा कोपरा लाभला होता..."

अन समोर दिसणारा अमीबा आता एका डेरेदार वृक्षात बदलला. त्या विशाल उदात्ततेतून पृथ्वीचा तरूणोहर्षित आवाज कानावर येत होता.

"वनस्पती मला प्रिय होती. मीही तिला प्रिय होते. तिनं एका कृतज्ञ पाल्याप्रमाणे माझं तनमन सांभाळलं... पण तरी मला कुठेतरी ओकंबोकं वाटत होतं... पंच महाभुतांप्रमाणे ही वनस्पती अस्थिर नव्हती उलट अचल होती. मला दुसरं अपत्यं हवं होतं. अस्थिर. चालू शकणारं. बुद्धी असलेलं. माझ्या पहिल्या अपत्यापेक्षाही जास्त प्रभावी, जास्त शक्तिशाली. मी तोही ध्यास घेतला. त्याच पंच महाभुतांच्या मदतीनं मग पाण्यात जीव बनवले. मासे बनले. मी आनंदाने सदोदित झाले. मग पाणी अन जमिनीवर राहणारे ऍम्फिबियन्स बनवले. त्यांना राहण्यायुक्त हवेसाठी वनस्पतींच्या मदतीनं वातावरणात प्राणवायूचं प्रमाण हवं तेवढं वाढवलं. त्यातून अंडी देणारे अन पिलांना जन्म देणारे प्राणी निपजले. आकाशात विहरणारे पक्षी बनले.

सरपटत आपल्या भक्ष्याचा पाठलाग करणारे डायनॉसॉर सदृश सरिसृप बनले. मी आपलं हे महा कुटुंब बनवून कृतकृत्य झाले होते. सस्तन प्राण्यांना बघून तर मला माझ्या आई होण्यावर कधी नव्हे तेवढा अभिमान होई. कारण त्यांतच मला दिसे, प्राण्यांतून प्राणी जन्माला यायची घटना. मला ती आजही विस्मयचकित करते. लहानग्या पिल्लाला आपल्या पोटातून जन्म देणारी अन नंतर आपलं दुध पाजणारी ही सस्तन मादी म्हणजे जणू माझं जिवंत प्रतीक होती. माझ्या मातृत्वाचा सारा अर्क तिच्यात उतरलेला मला दिसत होता..."

पृथ्वीचा आवाज आता शांत होता. अत्यंत समाधानी. पुन्हा डेरेदार वृक्षांतल्या फांद्या हलताना दिसू लागल्या. त्यांतून कुणीतरी पळत होतं. माकडांची मादी स्तनाशी चिकटलेल्या आपल्या पिलाला घेऊन त्या फांद्यात उड्या मारत होती... तिला त्याच वृक्षाखाली धावत असणाऱ्या कांगारूंच्या कळपाची धास्ती वाटत असावी... अचानक ते कांगारू पाण्यावरून धावले अन पाण्यातून उफाळून वर आले... दोन डॉल्फिन्स ... त्यात एक डॉल्फिन पिल्लू आपल्या आईचा वेग पकडायचा प्रयत्न करत होतं... पण आईने आपला वेग मर्यादेत ठेवला होता... मुद्दमून कमी वेगात असूनही ती ‘आपण केवढे वेगवान आहोत’, हा बाळकडू त्याला देत असावी....

"... मी म्हटलं बास्स! मी समाधानी आहे. कृतकृत्य आहे. वसुधैव कुटुंबकम माझं ब्रीद होतं. ते पूर्ण झालं होतं...", पृथ्वी आनंदित होऊन म्हणाली... "काही वर्षांचा अवकाश अन पुन्हा माझ्या सृजनशीलतेला धुमारे फुटले. कुठेतरी ह्या उत्कर्षाचा परमोच्च बिंदू मला पहायचा होता... असा जीव निर्माण करून ... जो सर्वश्रेष्ठ असेल... शारिरीक, बौद्धिक दृष्ट्या संपन्न असेल... जेवढा जगण्यात कुशल तेवढाच कुटुंबवत्सलही असेल.... जो माझ्या जीवसृष्टीला माझ्यावतीनं सांभाळू शकेल. माझं प्रतीक बनून....

अन तोच मला कल्पना सुचली...

तुझी...

मानवाची..."

एका सेकंदाचा अवकाश अन माकडांनी अचानक झाड सोडलं. ते जमिनीवर चालू लागले. त्यांनी चार पाय सोडले अन ताठ शरीरबांधणी पकडली. पुढारलेलं तोंड आत गेलं. दात सरळ झाले. मेंदू विकसित झाला. अंगावरचे केस कमी झाले. अन त्या बदलणाऱ्या माकडातून हळूहळू दिसू लागला मानव...

"मानवाला मी एवढी बौद्धिक कुवत दिली होती की वनवासी असूनही शेतीची कल्पना त्याला स्वतःच सुचली. त्याने वनवासी आयुष्य सोडलं अन घर-शेती बांधून आपलं अन आपल्या कुटुंबाचं संगोपन सुरू केलं. मानवाची बुद्धी कधीकधी मलाही चकित करून जाई.

वस्त्र, आग, चाक, हत्यार यांचे शोध मानवाच्या उत्क्रांतीतले मैलाचे दगड ठरले. मी मानवाला जी स्वायत्तता बहाल केलेली ती फळीस मिळाल्याचं जाणवून पुन्हा एकदा सुखावले होते... माझं वार्धक्य जवळ येत होतं पण मी मानवाला माझ्या जबाबदाऱ्या सोपवून मुक्त झालेले होते..."

पृथ्वीनं एक दीर्घ उसासा घेतला अन तिचा मध्यमवयीन आवाज पुन्हा जुन्या वार्धक्यात बदलला.

"... पण कुठेतरी काहीतरी चुकलं होतं वाटतं. कुटुंबवत्सल माणूस माझ्या वसुधैव कुटुंबकमशी प्रामाणिक राहिलाच नाही. अचानक माणसाने आपले समूह बनवले. आपली संख्या अनैसर्गिक रित्या बळावली. शेतजमिनी वाढवल्या. त्यासाठी माझ्याशी कृतज्ञ राहिलेल्या माझ्या वृक्षमित्रांना माझ्यातून उखडवून टाकलं. मला कुंपणानी जखडवून टाकलं. ह्याच तुकड्यातुकड्यांची गावं झाली. राज्य झाली. देश झाले. स्वगृहाय स्वहिताय मानून त्यानावाखाली दुसऱ्या मानव भावडांवर हल्ले चढवले. एकेमेकांच्या जमिनी हस्तगत केल्या. पण एवढं असूनही मानवाची बौद्धिक भूक काही शमली नाही. तो नवनवे आविष्कार करीत गेला. माझंच नव्हे तर माझ्या सूर्यपित्याचं अंतरंगही त्याने उकललं. अन त्यातूनच विसाव्या शतकात आण्विक ऊर्जा शोधली गेली. विधायक कामासाठी असली तरी ही शक्ती मानवासाठी सांभाळण्यासाठी बरीच महान होती. पण सत्तालालसेने त्याने तिचा दुरूपयोग केला. माझ्याच अंगावर तिचे प्रयोग केले. मग प्रत्येक मानवसमूह स्वसंरक्षणाच्या नावाखाली ह्या ऊर्जेला अधिकाधिक तीव्र बनवून तपासू लागला. त्याच सुमारास कोण्या अनाचाराने वेडावलेल्या माणसापोटी एक अतियुद्ध झालं अन त्याच्या परिणीतीत ही ऊर्जा मानवाने आपल्याच भावडांवर सोडली..."

अचानक पृथ्वीचा म्हाताऱ्या आवाजात ऊद्विग्नता दाटली ...

"... मी भाजले होते... पार पोळले होते... हा अंगावरचा चटका मला काही नवा नव्हता. पण माझ्या अंतःमनातला चटका माझ्यातल्या आईला खूप हेलावून गेला. माझं मानव मूल असं का वागतंय? मला कळायचा काहीच मार्ग नव्हता. चहूकडे आक्रोश झाला. मनुष्याच्या मनात असलेली लज्जा अजून कुठेतरी शाबूत होती कदाचित. ह्या ऊर्जेला पुन्हा वापरायचे नाही असे संगनमताने ठरवले गेले. पण तरीही सगळे शस्त्र बनवितच होते. ह्याच शस्त्रास्त्रांच्या अन विज्ञान क्रांतीच्या नावाखाली माणसाने उन्मत्तपणे माझ्या साधनसंपत्तीची लयतूट केली. माझं पहिलं अपत्य असलेली वनस्पती नष्ट होऊ लागली. पाणी, वायू, भूमी, आकाश...


ज्यांनी मानवास बनवले ती सारी पंचमहाभुतंच त्याने मलिन केली. ह्या प्रदूषणाने कित्येक मौलिक जीवांना नामशेष केलं. वातावरण बिघडवलं. कित्येक वर्षांनी शुद्ध झालेला पाऊस पुन्हा आम्लयुक्त होऊ लागला. पण मानवाला त्याची फिकर नव्हती. त्याला हवा होता फक्त स्वतःचा विकास. स्वार्थी अप्पल्पोटेपणा त्याच्या मनात साचला होता. ज्या माणसाच्या बुद्धीवर मला गर्व होता ती लालसेने मदधुंद झालेली मला दिसू लागली. मी वार्धक्याने कोसळलेले पण तरी स्वतःला नेटाने सांभाळत होते. हवामान बदल घडवून मानवाला त्याच्याच चुकांचा आरसा दाखवत होते. पण मानवाच्या बुद्धीला अविवेकाची बुरशी लागली होती. त्याने माझे इशारे दुर्लक्षित केले.... मी कोलमडत होते... आपल्या साधनसंपत्तीना मुकत होते....

अन एके दिवशी....

एके दिवशी

गहजब झाला...."

पृथ्वीने अचानक रागीट सूर पकडला... तिच्या आवाजात कमालीची थरथरता जाणवू लागली...

"तिसाव्या शतकात हा कृतघ्न मानव पुन्हा आपल्याच भावडांवर ऊफाळला. मानवजातीनं एकमेकांशी युद्ध केलं. पण ह्याखेपेस युद्ध झालं होतं ते माझ्या उरल्यासुरल्या साधनसंपत्तीवर कोण्या एका मानवसमूहाचा हक्क सांगण्यासाठी. हपापलेले ते सारे हिमालयासाठी झगडत होते. कारण तिथला बर्फ त्यांना पाण्याची गरज भागवण्यासाठी हवा होता. प्रत्येक समूहाने आपापली आण्विक शस्त्रं वापरली. पण एव्हाना आण्विक ऊर्जा सहस्त्र सूर्यांच्या पेक्षा शक्तिशाली झालेली होती. मोठमोठे विस्फोट झाले अन मी पुरती नेस्तोनाबूत झाले. हजारो सूर्य जणू माझ्यावर कोसळले होते. कितीही मोठी असले तरी मी उरले होते एक निर्जीव ग्रहच. मला ह्या गर्तेतून सावरायचा वेळच मिळाला नाही. माझ्यावर आम्लयुक्त वातावरण बनलं. ह्या पाण्याने काही वर्षातच दगडांची रेती केली. एके काळी माझ्या गळ्यात शोभून दिसणारा हिमालय ह्याच काळ्या रेतीनं बरबटला. सर्वं काही नष्ट झालं होतं. मी मेले होते. माझ्यात जैविक ऊर्जाच उरली नव्हती. पण एवढं होऊनही मानवाच्या बुद्धीला लागलेली स्वार्थीपणाची कीड काही गेली नव्हती. माझ्यावर युद्ध चालू असताना मानवाने इतर ग्रह शोधले अन तिथं आपलं बस्तान बसवलं. माझ्यावर लुटण्याचं काहीही शिल्लक राहिलेलं नसलेलं पाहून मनुष्य मला सोडून गेला. एखाद्या टॊळ धाडी प्रमाणे मानवाने माझे लचके तोडले अन तो नव्या ग्रहावरची साधनसंपत्ती ओरबाडण्यासाठी पुन्हा पुढे सरसावला.

ह्ह!

मानव!!

जो माझा सर्वश्रेष्ठ आविष्कार होता ...

... जो श्रमजीवी होता ...

तोच शेवटी परजीवी निघाला... "

असं म्हणून तो वार्धक्याने जर्जर झालेला पृथ्वीचा आवाज उपहासाने बंद झाला. समोरच्या निळ्या पृथ्वीचं रूप बदललं ते सद्ध्याच्या काळ्या पृथ्वीत. अन एक क्लोजप अचानक हिमालयावर गेला. तिथून कोण्या एका शिखरावर पोचला. दुरून तो चिवट घाणीने बरबटलेलाच दिसत होता. पण वाऱ्याबरोबर काहीतरी हललं अन त्या हालचालीवर फोकस झाला.

अचानक गॅरीच्या पोटात धस्स झालं. कारण हे एक निळ्या करड्या रंगाचं फूल होतं. हिमालयाच्या विषारी वायूंवर लहरत.

"दचकलास?", म्हातारी पृथ्वी पुन्हा बोलती झाली... "हो! मी पुन्हा जिवंत होत आहे. तू कदाचित विसरला असशील पण मानवाने एक ध्यानात ठेवावे. बदलांचं चक्र नेःमेक्रमाने सुरू असतं. एके काळी माझ्यावर राज्य होतं वनस्पतींचं, समुद्रीय जीवांचं, डायनॉसॉर्सचं आणि मानवाचं. पण आता मानवच मला सोडून गेल्याने मी त्याच्या राहत्या जीवसृष्टीला कायमचा रामराम ठोकला आहे. निर्जीव वाटत असले तरी माझ्यातली जननशक्ती तशीच आहे. हवेतला ऑक्सिजन केवळ मानवालाच हवा होता. शुद्ध पाणी ही मानवाचीच गरज होती. समुद्रात त्याने कधी घर बनवले नाही अन त्यात कधी त्याला पूर्णवेळ राहता आले नाही. ते मी त्याला दिलं. ते दिलं तसं मी ते हिरावूनही घेऊ शकते. म्हणूनच हे नवं रूप मी मानवाला राहण्याजोगं अजिबात बनवलेलं नाही. जेव्हा मानव इतर ग्रहांवरची साधनसंपत्ती वापरून नष्ट करेल अन त्याला नवे ग्रह शोधावे लागतील तेव्हा मी मात्र त्याच्याकडे बघत हसत असेन. कारण तोवर मी माझी स्वतःची एक जीवसृष्टी बनलेली असेल. घातक बॅक्टेरीयानं भरलेली, ऑक्सिजन शिवाय राहणाऱ्या वनस्पतींची, उकळणाऱ्या पाण्यात अन धगधगणाऱ्या जमिनीवर संचार करणाऱ्या वेगळ्याच जीवांची. छोटीखानी असलं तरी ते माझं कुटुंब असणार आहे.

अन ह्या वसुधैव कुटुंबकात करंट्या मानवाला खचितच स्थान नाही .... कारण ह्या आईने आपल्या एका नालायक मुलाचा आज स्वतःहून त्याग केला आहे..."

असं म्हणून पुन्हा हात पाय जाळवणारा ऊष्मा धगधगला आणि अमोनिया मिथेनच्या घाणीने भरलेला वास सभोवारी पसरला. मास्क मधला ऑक्सिजन जणू संपलाच असावा. गॅरीला गुंगी आली अन निर्ढावलेल्या सफेत प्रकाशात त्याचे डोळे दिपले. त्याने डॊळे बंद केले तशी त्याला ग्लानी आली आली...

"गिरिश गिरिश!", बाबा हाक मारत होते.
"अं!", गॅरीने डोळे किलेकिले केले. तो मागच्या सीटवर बसलेला होता. अन पेंगुळलेला असल्याने सीटवरून थोडा ओघळून खाली घसरला होता. त्याचे डॊळे खिडकीच्या बाहेर बघू शकतील एवढ्या उंचीवर जेमतेम होते. त्याने डोळे उघडले तसं त्याला फ्लोटर कारच्या बाहेरचं दिसू लागलं. शुष्क निर्जन सस्ता त्या लालेलाल संध्याकाळी मंगळावरचं औदासिन्य अधिकच दाटपणे जाणवून देत होता. गॅरीने त्याच ऑफ मूडमध्ये रस्त्याच्या कडेला नजर टिकवली अन अचानक काहीतरी दृष्टीक्षेपातून पार झालं. गॅरीनं झटकन मान वळवून मागे पाहिलं.

"इज दॅट .... इट कान्ट बी... बाबा ते मागे गेलं ते झाड होतं?"
"हो. का?", बाबा स्वाभाविकपणे म्हणाले.
"पण इथे झाड कसं काय...?", गॅरीनं ताठ बसून मान वळवून प्रश्न बाबांना केला तसा त्याला बाजूला बसलेल्या आजीचा धक्का लागला. गॅरीनं तिच्याकडे गोंधळून पाहिलं. आजीच्या उलट बाजूला पेंगलेली सुलेखा होती आणि कार ड्राईव्ह करणाऱ्या बाबांच्या बाजूच्या फ्रन्ट सीटवर आई होती.
आई म्हणत होती, "बिसलेरी संपायला आलीय. गॅरी बेटा चिप्स खाल्लेस की आहेत अजून. थोडेच असतील तर सगळं संपवून हे एवढं पाणी पिऊन घे."

आईनं त्याला पाण्याची बाटली दिली. गॅरी तिच्याकडे शून्यात बघत होता.

"!"

आईनं मागे वळून गॅरीकडे पाहिलं. ती शांतपणेच गॅरीला म्हणाली.
"अजून राग गेला नाहीये का तुझा? हे बघ सॉरी. मी गाजर हलवा बनवेन उद्या. ठिकाय. पण तुला मी सकाळीच सांगितलं की सुलेखाला माझ्यापेक्षा चांगला बनवता येतो. मी तिला सांगेन बनवायला. पण तू तिच्याशी तरी नीट वागलास तर. तिच्या हजेरीत असताना झुरळं पुन्हा किचनमध्ये सोडलीस तर ती रागावून काम नाही करायची..."
"हो आणि मीही माफी मागते तुला गिरिश म्हटल्याबद्दल.", आजीने आईच्या संभाषाणाचा धागा पकडला, "सकाळी जास्तच सक्तीने वागले तुझ्याशी. मला माहितिये. आजोबांनी नाव ठेवलंय म्हणून ते तुला आवडेलंच असं नाही. "सगळे सॉरी म्हणतायत तर मीही सॉरी म्हणतो तुला.", बाबाही म्हणाले, "फार्महाऊसवर जाऊन तुला जर झाडं लावायची नसतील तर ठिक आहे. मी आणि आई लावू. तुला जबरदस्ती करणार नाही."

गॅरीला काहीच कळेनासे झाले होते...

गॅरीनं पुन्हा बाहेर पाहिलं. नेहेमीचा डांबरी रस्ता दिसत होता. तो त्याच्या इंडिका कार मध्येच होता. त्याने खिडकीची काच खाली केली तसं धूळीने माखलेला वारा आत शिरला.

त्याने त्याच्या हातातलं लेजच्या चिप्सचं आवरण टाकण्यासाठी बाहेर नेलं अन अचानक थंड वाऱ्याने ते फडफडलं. त्याच्या अंगावर काटा सरसरला अन आज सकाळी घडलेल्या घटना सरर्कन त्याच्या मनातून त्याच्या स्मरणात आल्या.

पहिली गोष्ट म्हणजे तो पृथ्वीवरच होता. मंगळावर नाही. आज त्याचा दहावा बर्थडे. सकाळी सकाळी मामाकडून गिफ्ट मिळालेल्या रिमोट कंट्रोल्ड रोबोटवर सुलेखाने चुकून पाय ठेवला म्हणून गॅरी रागावला होता. तिनं मुद्दमून ते केल्याचं समजून गॅरी तिच्याशी भांडला अन बदला घ्यायचा म्हणून नाश्ता बनवताना एक झुरळ किचन मध्ये सोडलं. त्यावर भांबावलेल्या सुलेखाने गॅरीला डोळे मोठावून ताकिद दिली होती. आईला चोमडेपणा केला नसला तरी नंतर आजीला ही गोष्ट कळली अन तिनं लेजचे चिप्स खाऊन कचरा दिवाणखान्यात फेकलेल्या गॅरीला समजावलं. त्यात आजीनं गिरीश म्हटलं म्हणून त्याने आजीशी भांडण केलं. तिनं आवर्जून त्याला आजोबांचा अन हिमालयाचा संदर्भ सांगितला. भांडण कडाक्याचं झालं तेव्हा आई बाबा आले. तिनं सगळं त्यांनाही सांगितलं. त्यामुळे आईने रागावून गॅरीचा आवडता गाजर हलवा बनवला नव्हता. गेल्या आठवड्यात गॅरीला बाबांनी आर्थर क्लार्क यांची ‘रिट्रीट फ्रॉम अर्थ’ ही विज्ञानकथा दिलेली पण गॅरीनं काही भाग अर्धवट वाचून ती पूर्ण झाल्याचं बाबाना काल खोटं सांगितलं. त्यात बाबांनी आज अलिबागला गेल्यावर दहा झाडे लावायचा आपला बोरींग प्लान त्याला सांगितला.

एकूणच काय तर दहावा बर्थडे जितका स्पेशल असायला हवा होता तितका तो झाला नव्हता. त्यामुळे ह्या साऱ्या प्रकारानं गॅरी वैतागला होता.

मग आजच्या दिवशी त्याचं मन मोडू नये म्हणून बाबांनी नाईलाजाने कार काढली. अन ती चालवत असताना पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी कारने प्रवास न करता बोटीने किंवा रेल्वेने गावी जाणं किती उपयुक्त आहे हे लेक्चर कारमध्येच देणं सुरू केलं. त्यामुळे कंटाळून गॅरीला तिथं झोप लागली.

अन "मनी वसे ते स्वप्नी दिसे" या उक्तीप्रमाणे ते स्वप्न त्याला पडलं.

पण काळ्या विषारी पृथ्वीचं हे स्पप्न खचितच त्याची झोप आणि त्याचा मिजास पार उडवणारं होतं. आपल्या साऱ्या कृत्यांचा जाब जणू पृथ्वीने त्याच्या स्वप्नात येऊन त्याला विचारला होता.

गॅरीला चुकचुकल्यासारखं वाटत होतं. आपल्याशीच शरमलेल्या त्यानं ते लेजचं आवरण मुठीत आवळलं अन आपल्या खिश्यात लपवलं. खिडकी बंद करून तो मुकाट्याने त्याच्या सीटवर मुटकुळं करून बसला.

"गॅरी एवढा गप्प गप्प का आहेस?", आजी विचारत होती.
"काही नाही. असंच.", गॅरीनं थोडक्यात उत्तर दिलं.
"हे बघ मी म्हटलं ना. तू झाडं नको लावूस. मी आणि आई लावू. ओके?", बाबा म्हणाले.
"नाही ते नाही.", गॅरीनं ओशाळून म्हटलं, "बाबा, मीही करेन तुम्हाला मदत... आणि दहा कशाला पंधरा झाडे लावू आपण."
त्याने लक्ष आईकडे वळवलं, "आई, पुढच्या खेपेस मामाला खेळणी नको पण पृथ्वीचा एन्साक्लोपिडिया आणायला सांग..."
"आणि आजी तू गिरीश म्हटलेलं चालेल मला. इन फॅक्ट तुम्ही सगळ्यांनी म्हटलेलं चालेल...", गिरीशनं थोडं हसून दाखवलं. पेंगुळलेल्या सुलेखाकडे बघत.
"सुलेखाने म्हटलं तरीसुद्धा चालेल... आणि बाबा पुढल्या खेपेस आपण बोटीने अलिबागला जाऊ. कारने प्रदूषण जास्त होतं..."

दोन मिनिटं कुणी काहीच बोल्लं नाही.

गिरीश हे सगळं स्वतःहून म्हणतोय ह्याचा आजी आई बाबांना प्रथम विश्वासच बसत नव्हता. सगळे विस्मयकारक चेहेऱ्याने गिरीशकडे बघत होते. पण स्वतःशीच आनंदीत झालेला तो खिशातला लेजचा कपटा घरी जाऊन तिकडच्या कचऱ्याच्या टोपलीत टाकायचा असं मनोमन ठरवून पुन्हा झोपी गेला...










आणि मित्रांनो, गिरीशला ह्याखेपेस संपूर्ण निळ्या पृथ्वीचं स्वप्न पडलं. बरं का.











विश्वासघात!

हाताला चिकटलेलं रक्त पाहून मला दरदरून घाम सुटत होता. छब्या असं काही करेल याची मला स्वप्नातही कल्पना नव्हती. सैरभैर मी काळॊखाच्या कभिन्न सावलीत मुख्य रस्त्यावर येऊन घरचा मार्ग पकडला. तिकडे आईला जाऊन मी सगळं सांगणार होतो. पण एक अनामिक बल मला थोपवू पाहत होतं. "परत जा. मागे फिर. छब्याला गाठायलाच हवं!" माझं मन जड झालं होतं. मी स्थित्यंभू झालो होतो...

.... "मित्र! मित्र नाही शत्रू आहेस तू." हेच माझे काही मिनिटांपूर्वीचे शेवटचे शब्द. किरणचे हातातले प्रेत टाकून मी पळू पाहत होतो. छब्या माझ्याकडे पाहून प्रसन्न हसत होता. "मन्या! हे बघ. त्याचे बोट. ही बघ शर्वरीची अंगठी. हवी होती नं आपल्याला."... "तुला, तुला हवी होती ती. तरी मी सांगत होतो आपण आज पार्टीत जायला नकोच होतं!", माझे शब्द पूर्ण न करू देत छब्या त्याच्याच अवसानात रमलेला होता, "शर्वरीची अंगठी कुणाच्याच बोटात जाऊ देणार नाही मी. तिच्यावर फक्त माझा हक्क आहे. मी... केवळ मीच!", अन छब्या ती किरणच्या बोटातून खेचू लागला, "छ्या! किरणनं साल्यानं स्वतःच्या मापाची फिट़्ट बसवून घेतलीय. काढू कशी?" छब्या काही क्षण विचारात गुंतला अन मग त्याचे डोळे चमकले. मला शिसारी आली, "अरे छब्या! अरे काय करतोस हे? एक तर त्याला मारून टाकलंस अन आता त्याचं बोट कापतोयस. अरे कशाला हवी ती अंगठी आपल्याला. हे बघ पोलिसांकडे चल. ते सांभाळून घेतील. "

"हो! श्युर! पोलिसांकडे जायलच हवं." छब्या अचानक समजूतदारपणे बोलू लागला, "मी असं करतो की पोलिसांना तुझं नाव सांगतो. हा चाकू तुझ्या घरचा. हा मोबाईल! किरणचा! ज्यावर तू किरणला फोन केलास. हा बघ, हाच ना! तुझा नंबर! किरणच्या मोबाईलवर शेवटी आलेला, बघूया बरे... ", छब्याने मोबाईलची कळ दाबली अन शांततेला चिरत सारी वनराई माझ्या मोबाईलने चाळवली गेली.

मी हडबडलो अन मोबाईल खिश्यातून काढून फेकून दिला. छब्याचा मला राग आला होता पण छब्या माझा जिवलग मित्र. "छब्या अरे काय हा वेडेपणा! सोड तो मोबाईल! इथून तरी चल! पोलिसांकडे नाही पण घरी तरी!", मी त्याला पुन्हा गमावू इच्छित नव्हतो. आज खूप दिवसांनी तो मला भेटला. माझा बालपणीपासूनचा मित्र. एकमेव मित्र. माझा जीवच तो. ह्या वादळात मी त्याला एकटा सोडू कसा! माझं मन मानत नव्हतं. छब्याशी क्षणिक फारकत घेऊन मी निघालो होतो खरा, त्याला एकटं मागे टाकून पण मला माझाच राग येऊ लागला होता. मुख्य रस्त्यावर पोहोचेस्तोवर माझं मन नस्त्या शंका कुशंकानी चोंदलं होतं. किरणच्या मर्त्यभूमीवर परत जाण्याची अनेच्छा असूनही माझे पाय परत वनराईत वळले. मला छब्याला गाठायचंच होतं.

खूनाची जागा तशी दूर होती. चंद्रप्रकाशात अंधूक चंदेरी पण बरेच काळवंडलेले नागमोडी रस्ते संपायचे नाव घेत नव्हते. आजूबाजूला रातकिड्यांची किर्रकिर्र माझ्या कानांशी कुजबुजू लागली. अचानक टाळ्यांचे आवाज येऊ लागले. ह्या टाळ्या होत्या आजच्या पार्टीतल्या. संध्याकाळचा साखरपुडा. किरण अन शर्वरीचा. छब्या, मी अन इतर शंभर लोकांच्या हजेरीत किरण-शर्वरीनी अंगठ्या बदलल्या. सगळे खूश होते. मी अन छब्या सोडून. आजच परदेशातून आलेला छब्या. अन आजच्या आनंददाई दिवशी अस्सा नियतीचा अघोरी खेळ. काहीच वर्षांपूर्वी छब्या कामानिमित्त परदेशी निघून गेला. एवढी वर्ष कुणाशी फोनवर बोलला नाही. पत्र पाठवली नाहीत. पण आज त्याचा फोन आला. मुंबईला आलोय म्हणून. आता इतकी वर्ष त्याची वाट पाहल्यावर शर्वरीलाही दोष देणेही बरे नव्हते. तिनं मग कंटाळून किरणचा हात धरला. छब्याचे कॉलेजपासूनच शर्वरीवर प्रेम होते. पण त्याने आणि मी तिला कधी त्याबद्दल सांगितले नाही. तसे तिच्या डोळ्यातले भाव छब्याला पाहताच बदलायचे. ते पाहून मला पूर्ण विश्वास वाटत होता की ती नक्की त्याची वाट पाहील. जाण्यापूर्वी मी छब्याला तसं सांगितलेलंही होतं. माझ्या विश्वासावरच तर छब्या प्रसन्न मनाने परदेशी उडाला.

पण तो विश्वास फोल ठरला. शर्वरी किरणची झाली. छब्या रडरड रडला. मीही मग त्याच्या सोबतीस मन हलकं करून घेतलं. घरी परतल्यावर सुजलेले डोळे पाहून आईने पृच्छा केली नसती तर नवलंच. पण नेहेमीप्रमाणे मी आईला त्याबद्दल सगळं सांगितलं. आई पण थोडी चिंताक्रांत वाटत होती. पोरक्या छब्याविषयी तिची चिंता मलाही सल लावून गेली. शेवटी जे व्हायचं नको होतं तेच झालं. आज रात्री आई झोपली असताना छब्या गुपचूप घरी येऊन मला शपथेवर काही न सांगता इथे घेऊन आला आणि बघतो तर काय किरण आधीच हजर! त्याच्या अन माझ्या समोरच, छब्यानं लपवलेला चाकू काढला.... अन त्यानंतरची किरणची किंकाळी .... अजूनही माझ्या कानी घुमतेय!

काहीतरी चंद्रप्रकाशात तळपलं अन माझे डोळे उजळले. तोच चाकू. समोर पडलेला. मी उचलला आणि थोडकं पुढ्यात पाहिलं. भीतीचा मुरडा माझ्या पोटी धसला. तिकडे किरणचं प्रेत नव्हतंच. मी आजूबाजूस पाहिलं. सगळीकडेच रक्ताचे डाग पडलेले होते. छब्याने प्रेताची विल्हेवाट लावायला प्रेत कुठे नेलं हे कळायचा मार्गच नव्हता. प्रेताची विल्हेवाट लावली तर सुटण्याचा मार्ग आणखी दुष्कर होईल हे मी जाणलं होतं. आता छब्याला गाठणे अधिकच गरजेचे झाले होते. मी न रहावून "छब्या छब्या!" अशा हाका मारू लागलो. चौथ्या पाचव्या हाकेचा प्रतिध्वनी आला तोच माझ्या मागे पालापाचोळा तुटल्याचा मला आवाज झाला. मी चमकलो. लायटर पेटवला अन विजेच्या गतीने मागे वळलो. समोरच प्लॅक्सोच्या झुडुपाची गच्च पानं एकसुरात हलत होती. मी बळ एकवटून झुडुप दून सारलं अन तोच समोरून कुणीतरी माझ्या अंगावर धावून गेलं. माझ्या हाताला लायटर पडला अन विझला. मी त्याला रोखण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण तो हात माझा चेहेरा सोडतच नव्हता. मी संपूर्ण ताकदीनिशी त्याला दूर सारलं आणि जीवाच्या आकांताने पळू लागलो. पण त्याने मला गाठलेच अन मागून त्याचा बळकट हात माझ्या गळ्यात अडकवला.

त्याच्या ढोपराच्या अडकित्त्यात सापडलेल्या माझ्या मानेतून माझा श्वास छातीतच अडकला. माझं हृदय बंद पडू लागलं होतं. डोळ्यांच्या रेषा आक्रसू लागल्या. तोच समोर एक छबी अवतीर्ण झाली. अस्पष्ट आवाज ऎकू आला.

"मन्या! मला सोडून जातोयंस?"
"छब्या!", हा छब्याचा आवाज होता. श्वास अडकलेला असूनही मला हायसं वाटलं. मी मदतीसाठी हात त्याच्याकडे टाकले, "हेल्प मी! प्लीज!"
"व्हाय शुड आय!", त्यानं थंड आवाजात म्हटले, "तुला श्वास घ्यायला जमत नाहीये. तू मरणार हे निश्चित. त्यात तुझे डोळे लाल झालेत. घामही येणं बंद झालंय! बस थोडा वेळ! काही क्षणातच तुझा पार्थिव सृष्टीशी संपर्क तुटेल. तू उंच आकाशी भरारी घेशील. तिथून आईला पाहशील, शर्वरीला पाहशील. दोघी रडत असतील तुझ्या नावाने. पण मी मात्र हसत असेन. तुझ्याकडे ऊंच पाहत. आता शर्वरी आणि आई, दोघींचा वाटेकरी मीच. मीच दोघींचा आसरा!", त्याचे ओठ रुंदावले अन क्रूर हास्य त्याच्या चेहेऱ्याच्या स्नायूंत पसरलं. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते. मी त्या बळकट हाताला हिसडे देऊ लागलो. त्या हातांत जबरदस्त ताकद होती. "हेल्प! हेल्प!", मी जसा ओरडू लागलो, तसा तो फास अधिकच घट़्ट झाला. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी दाटू लागली. छब्याच्या गालावर पडलेली खळी आता अस्पष्ट होत होती. तो हसत होता. त्याचं हास्य माझ्या कानांत घुमू लागलं.

"छब्याने तुझा विश्वासघात केला", ते हास्य कुजबुजू लागलं, "मित्र म्हणून ज्याच्यावर तू जीव ओतलास तोच तुझा कली झाला!"
"का! मी त्याचं काय बिघडवलं?", मी स्वतःस केलेला हा शेवटचा प्रश्न! ते विचारण्याधीच माझं अंतिम स्पंदन माझ्या छातीत विरून गेलं. मला मारणाऱ्याचा चेहेराही मी पाहू शकलो नाही.

माझा "का?" शेवटपर्यंत अनुत्तरीतच राहिला होता.....
[क्रमशः]


दुसऱ्या दिवशी स्थानिक पेपरात छापून अलेली ही बातमी

विश्वासघात... कुणी कुणाचा!

दि. १५ डिसेंबर, २००६

मित्राने मित्राचा विश्वासघात केल्याचा घटना त्रिकालाबाधित असतात, ह्याचे उदाहरण काल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घडलेल्या एका खूनाने दिसून येते. शर्वरी मांडके आणि किरण सरपोतदार यांचा कालच साखरपुडा होता. रात्रीच्या जेवणानंतर किरणला त्याचा मित्र मनिष वर्देकरकडून त्याच्या मोबाईलवर फोन आला. मनिषनं त्याला नॅशनल पार्क यथे एका निर्गम ठिकाणी बोलावले होते. कदाचित तिथं त्यांच्यात बाचाबाची झाली असावी ज्याची परिणीती एका हत्याकांडात झाली. सकाळी दहा वाजता येथे जॉगिंगसाठी येणाऱ्या लोकांना मनिष आणि किरणचे मृतदेह सापडले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले असून पोस्टमॉटमला पाठवले आहे. तरी पोलिसी सूत्रांनुसार प्रथम मनिषने किरणला चाकू भोकसला असावा पण शर्थीच्या जोरावर किरणनं त्याचा गळा पकडून दाबून त्यास ठार मारले असेल. पण त्यानंतर किरणचा मृत्यु अतिरक्तस्त्रावाने झाला असावा. "छब्या" ह्या नावाचे एक गूढ ह्या प्रसंगात लपलेले असून, रात्री पार्कच्या वॉचमनने इथे "छब्या" नावाची हाक चार पाचदा ऎकल्याचे कळते. अजून एक दोन दिवसांच्या शोधकार्यात इतर धागेदोरे अन हा छब्या सापडेल असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. मनिषच्या पश्चात त्याची विधवा आई श्रीम. कुसुम वर्देकर आहेत.

******** C A S E - D E T A I L S *********

दि. २० डिसेंबर २००६.
स्थळ: बोरिवली (पू.) पोलिस ठाणे
केस. क्र. २००१०
माहिती: मनिष वर्देकर आणि किरण सरपोतदार मर्डर केस
कार्यस्थिती: अशिल मनिषच्या आई श्रीम. कुसुम वर्देकर आणि मैत्रीण शर्वरी मांडके यांच्या लिखित साक्षीने ही केस बंद करण्यात येत आहे.
साक्ष: शर्वरी मांडके यांच्या म्हणण्यानुसार तिचे किरणवर कॉलेजपासून प्रेम होते. मनिष दोघांचा कॉलेजातला जिवलग मित्र. तसा एरवी एकटा राहायचा. त्याला कित्येक वेळा त्यांनी त्यांच्या ग्रुप मध्ये सामील करायचा प्रयत्न केला होता. पण तो म्हणायचा, "मी छब्या बरोबर जाईन, छब्याबरोबर राहिन". त्यांना वाटायचे त्याचा दुसऱ्या वर्गातला कुणी क्लासमेट असेल. एरवी छब्याविषयी मनिष भरपूर बोलायचा. शर्वरीला हा छब्या कोण ह्याचे अतिशय कुतुहल वाटत होते. शेवटी कॉलेज सोडून १४ डिसेंबरला, तब्बल तीन वर्षांनी शर्वरीने त्याला तिच्या अन किरणच्या साखरपुड्याला बोलावायचे म्हणून तिने मनिषला फोन केला. मनिषने, "छब्यालाही आणू का?" असं विचारले. तिने होकार दिला. पण नंतर साखरपुड्याला दोघे आले नाहीत. कदाचित गर्दीत दिसले नसावेत. त्यांच्या नावाचा रोजबुके मात्र मिळाला. मग संध्याकाळी किरणला मनिषकडून फोन आला. तिच किरणला शर्वरीने पाहिल्याची शेवटची वेळ.

मनिषच्या आई कुसुम वर्देकर ह्यांच्या साक्षीनुसार मनिषचा जिवलग मित्र छब्या ह्याचे किरणची प्रेयसी शर्वरीवर प्रेम होते. म्हणूनच मनिष अन छब्याने किरणला त्याच्या साखरपुड्याच्या दिवशी रात्री अज्ञात स्थळी बोलावले अन चाकू भोसकून त्याची हत्त्या केली. शेवटचा प्रयास म्हणून किरणने मनिषला एकवटवून गाठले व त्यातच गळा दाबून त्याचा मृत्यू झाला. ज्याची भीती होती तेच झाले. मनिषच्या आयुष्यातला हा भास अखेर त्याच्या खुनाने संपला. मध्यंतरी कितीतरी उपाय करून मनिष छब्याला विसरला होता. पण मनाचे खेळ कुठे संपतात. छब्याला पोलिस कधीच अटक करू शकत नाहीत. कारण मनिषबरोबर छब्याचाही खून झाला आहे!

छब्या मनिषच्याच मनाचे विकृत रूप होते.....
.... मनिष स्किज़ोफ्रेनिक होता.....

******* C A S E - C L O S E D *********



माझ्या सोबत घडलेल्या विनोदी घटना...

मी इंजिनियरींगची परीक्षा देत होतो. खूप बिझी होतो. तेव्हा माझा ज्युनियर केजीतला चुलत भाऊ अद्वैत घरी आला होता. तो खेळत असताना भरपूर मस्ती चालू होती आणि मला अतिशय डिस्टर्ब होत होतं म्हणून मी त्याला दोनतीनदा प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला. पण सगळं व्यर्थ.

शेवटी माझं डोकं दुखू लागलं अन मी मटकन खाली बसून बाम लावू लागलो. अद्वैत ने मला विचारलं, "काय झालं दादा!"

मी म्हणालो, "तू खूप मस्ती करतोयस म्हणून माझं डोकं दुखतंय"

अद्वैत म्हणाला....... "ट्युमर झाला असेल !!!!!"

************************************

आमच्या सोसायटीच्या नवरात्रोत्सवात एक मुलगा हरवला, मी त्याला शो चे संचालक म्हणून माझ्या पप्पांकडे घेऊन गेलो. पप्पा स्टेजवर आले अन त्यांनी आधी मराठीत अनाउन्समेण्ट केली, "आम्हाला एक हरवलेला मुलगा सापडलाय, अशोक नावाचा. त्याचे नातेवाईक कुणी असतील तर त्यांनी कृपया त्याला येऊन घेऊन जावे." खूप वेळ कुणी न आल्याने मग नाईलाजाने पप्पांनी त्यांच्या इण्टरनॅशनल हिंदीत संवाद साधला, "कृपया ध्यान दो. हमको एक घूमाहूवा (म्हणजे हरवलेला) अशोक लडका मिला है। अगर इसका नातेवाईक (रिश्तेदार आठवलं नाही म्हणून!) कोई सुन रहा है तो जल्दी इसको लेके जाव।"

त्यानंतर मी कधीही पप्पा हिंदी बोलत असताना सटकतो!!!

************************************

अद्वैत चा आणखी एक किस्सा. नर्सरीतला.

एकदा अद्वैत ची आई , माझी मामी, जमिनीवर बसून काम करत होती. थंड लादीवर बसल्याने तिच्या पायाला मुंग्या आल्या. अचानक दुसऱ्या खोलीत बसलेल्या अद्वैत ने तिला त्याने काढलेले चित्र पाहण्यास बोलावले. मामी ने हळूच पाय सावरायचा प्रयत्न केला पण पाय जड झाल्याने ती किंचाळली, "आई गं! पायाला भरपूर मुंग्या आल्यात". ते ऎकताच अद्वैत पळत आजीकडे जाऊन तिच्याकडून बेगॉन स्प्रे घेऊन आला!!!

*************************************

आमच्या शाळेतल्या दीक्षित बाई ५५-६० वर्षाच्या असतील. तशा म्हाताऱ्या दिसायच्या पण त्यांचे दात एकदम पांढरे शुभ्र. एकदा टीचर्स डे ला फेवरीट टीचर आम्ही त्यांना ड्राय फ्रूट्सचं कंदहार हॅम्पर (ह्यात अक्रोड, बदाम, पिस्ता, अंजीर आपल्या कवचात न सोललेले असतात) द्यायचे ठरवले. शाळेच्या मधल्या सुट्टीत क्लास मॉनिटरच्या सल्यानुसार अचानक सगळ्यांनी गिफ्ट बदलायचं ठरवलं. ड्राय फ्रूट चं हॅम्पर बदलून चॉकोलेटचं गिफ्ट आणलं!!! आणि त्यासाठी १५० रूपये जास्त मोजले. मी तेव्हा वर्गात नव्हतो.

ड्राय फ्रूटची आयडिया माझी होती. पण मला न सांगता गिफ्ट बदललं म्हणून मी नाराज झालो अन क्लास मॉनिटरला जाब विचारला.

तो शांतपणे मला स्टाफ रूम मध्ये घेऊन गेला आणि बघतो तर काय दीक्षित बाई संत्र चोखून खात होत्या. त्यांची कवळी बाजूच्या पाण्याच्या ग्लासात ठेवलेली होती!!

***************************************

लहान असताना माझी ताई आणि मी आम्ही भरपूर भांडायचो. म्हणजे चक्क मारामारी करायचो. एके दिवशी मारामारी करताना ताईने मला धक्का दिला अन मी कोलमडून पडलो. त्यात माझा चश्मा फुटला. माझ्या डोक्याला टेंगूळ आला म्हणून मी आईकडे रडत तक्रार केली. मम्मी अन पप्पा ताईला भरपूर ओरडले.

आणि संध्याकाळी एकत्र जेवताना आम्हाला म्हणाले, "चश्मे घालून भांडण करत जाऊ नका!"

म्हणजे ही काळजी मला मार लागला किंवा टेंगूळ आला म्हणून नाही, तर दोन हजाराचा चश्मा फोडला म्हणून.

धन्य ती आई वडिलांची माया.

***************************************

शाळेत घडलेली खरी घटना. गणिताच्या वेळी भोसले सरांनी आम्हाला प्रश्न विचारायाला सुरूवात केलेली. त्यांनी आधी मला ऊठवले, विचारले, "१९ चा पाढा सांग!". मल येत नव्हता म्हणून मी "मला येत नाही सर!!" असं म्हटलं. त्यांनी माझ्या बाजूच्या अभिजीत देसाईला विचारले. त्यालाही येत नाही म्हणून तो म्हणला, " सर १९ नाही पण २० चा चालेल ?"

आठवण मित्रांची...

कॅंटिनच्या तपकिरी चहाचा तो उग्र दर्प
अन चहावाढपी चंदूच्या नवनव्या हेयरस्टाईल्स.
माझ्या त्यावर नाना कोट्या
ॠषभच्या असायन्मेण्ट्स अन पसरलेल्या फाईल्स.
डोळे बंद केल्यावर सारं लख्ख दिसतं
अन पुन्हा डोळे उघडायचं मन होत नाही.
पुढ्यात चहा अन कोरे कागद असले तरी
मित्रांच्या घोळक्याविना ते आनंद देत नाहीत.

दाराशी जमलेल्या गर्दीतून वाट काढत येणारा सागर
अन नव्या मुलीला न्याहाळत त्याच्या प्रशस्तीच्या तऱ्हा.
नादिराचा मोबाईल फोनवरील दिनक्रम
अन गचाळ आनंदच्या शर्टावर अपरीट चरा.
आज मोबाईल वर व्यावसायिक दिनक्रम जातो
पण नादिराशी बोलणं होत नाही.
नव नव्या मुली भोवती असूनही त्यांची
प्रशस्ती सागरशिवाय मनी येत नाही.

शेवटच्या बेन्चशी झालेली चार वर्षांची सलग लगट
अन उशीरा येताच मित्रांना वेधायचं.
तीन जणांच्या बाकावर चारांची जेमेतेम सोय
प्रोफ.च्या आड चोरून मित्रांना ग्रुप मेसेजिंग करायचं.
आज ऑफिसाताल्या प्रशस्त क्युबिकल मध्ये
इमेल फॉरवर्ड करतो पण ग्रुप मेसेजिंग होत नाही.
एसेमेस च्या मागे गेलेल्या त्या एका रूपयाची किंमत
महिनाखेरीच्या तीस हजारातही जात नाही.

सेमिस्टरएक्झाम मग दणक्यात यायची
मित्रांच्या मस्तीला फूट पाडायची.
अभ्यासासाठीचा महिना असाच मग
परीक्षेस न जुमानत, मजेत काढायचा,
अन सबमिशनचं भूत मागे लागताच
लिहून लिहून फाईल्सचा खलिता भरायचा.
राहिलेल्या दिवसांतली मग तुटपुंजी
शेवटच्या आठवड्याची तयारी
त्यातही मग परीक्षेच्या
आदल्या रात्रीची केलेली नाईट वारी
आजही कामासाठी रात्र जागतो पण
त्यास मित्रांची साथ मिळत नाही,
जागून जागून केलेल्या अभ्यासाचं ते
मिडनाईट ऑईल मात्र जळत नाही.

मग सत्र परीक्षा अशीच जायची
निकाल घेऊन दणक्यात परतायची
निकालाच्या आधीची चिंता सतावायची
मग युनिव्हर्सिटीची फेरीही मारायची.
ताणतणावाचा नेल बायटींग ठाव
प्रत्येकाच्या ठायी दिसायचा
नादिराचा फोन, रंगील्या सागरचा मिजास
त्या कोऱ्या रीझल्ट बोर्डाशी हरायचा.
निकाल लागताच स्वतः आधी
मित्रांचीही श्रेणी पाहायची
ॠषभ आनंदशी फर्स्ट क्लासची ट्रीट मागत
सागरला पुढल्या केटीची रीत सांगायची.

शेवटची सत्रपरीक्षाही नेहेमीसारखी यायची
निकालबोर्डाशी अशीच गर्दी जमवायची
पण पुढल्या सत्राची पोकळी लक्षात येताच
डोळ्यातली पोकळी मात्र पाणवायची.
उच्च शिक्षण, नोकरी, करीयर यांचा ओझी
क्षणात डोक्यावर जाणवायची
अन त्याच ओझ्याखाली वाकलेल्या
सॅग, ॠषी, नॅड्झ अन ऍण्डीवरही दिसायची.

त्यांची साथ सुटली, आता बरीच वर्षं झालीत
मी मात्र मनातल्या विवेकावर हसतो
म्हणतो त्यास, "स्वार्थी झालास बुवा आजकाल!
मित्रांचा भावही तुझ्या ठायी नसतो."
तो म्हणतो, "अरे, मित्र फक्त वळणाशी भेटतात
नव्या दिशा वेधतात मग सोडून जातात,
पोचायचं ठिकाण त्यांनाही ठाऊक नव्हतं
पण खरे मित्रच असा प्रवास करू शकतात."
मी म्हणतो, "इतके काटे सहज झेलले पण
आता मित्रांविना पुढे कसा चालू?
आयुष्याच्या अथांग सागराशी पोचलो,
पण पायातच रूतू लागलीय त्याची वाळू."
विवेक हसतो अन डोळे बंद करतो
मग बराच वेळ डोळे उघडत नाही.
मी मात्र डोळे उघडतो
अन मोबाईलवर मित्रांची नावं बघून आनंदतो.
"हॅप्पी फ्रेण्डशिप डे", म्हणून
सगळ्यांचे मेसेजेस आलेले असतात
माझ्यासारखेच बहुदा, मनविवेकाशी,
तेही मनातल्या मनात भांडलेले असतात...

एकापेक्षा एक

विनोदची होणारी बायको कविता, चाचरत तिच्या होणाऱ्या सासूला, म्हणाली, "आई, तुम्ही लग्नासाठी घेतलेली पैठणी आहे ना अगदी तशीच एका महिन्यापूर्वी माझ्या आईनेही आणलीय. आता लग्नात दोघींनी तिच घालणं बरं दिसत नाही. म्हणून मग ...", कविता थोडी थांबली पण शेवटी हिम्मत करून म्हणालीच, "... तुम्ही तुमची साडी बदलून घ्याल का? प्लीज?"

कविताची सासू त्यावर अकडूपणे कविताला म्हणाली, "नाही बाई. बदलायला मला नाही जमणार. आधीच ती इथे मी आमच्याकडच्यांना दाखवलीय. माझ्या सोशल सर्कल मधल्या मैत्रिणींना, विनोदच्या आत्यांना, माझ्या बहिणींना, सर्वांनाच. त्यामुळे मी तर तीच घालणार आहे. तू तुझ्या आईला का नाही बदलायला सांगत? "

ह्यावर रागावलेली कविता गप्पपणे घरी परतली.
"काय झालं?", तिच्या आईने विचारलं.
"सासूबाईंनी साडी बदलायला नकार दिला."
"मग ह्यात तुला रागावयाला काय झालं?", तिच्या आईने शांतपणे विचारलं.
"अगं पण तू किती आशेने ती साडी माझ्या लग्नाच्या मुहूर्तासाठी घेतलेलीस. बाबा आणि माझ्या सोबत एक महिना मुंबईतले सगळे मार्केट्स धुंडाळल्यावर तुला सापडली होती ती साडी. किती स्पेशल होती ती तुझ्यासाठी...", कविताच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
"अगं जाऊदे ना. मी वेगळी घालेन लग्नात.", आई शांतपणे म्हणाल, "तू रडू सोड पाहू आधी."
"पण आता ह्या धांदलीत तू ती बदलणार कशी आणि कधी?", कविताने डोळे पुसत आईला विचारलं.
ह्यावर कविताची आई तिला चेहेऱ्यावर कसलाच न भाव आणत म्हणाली, "तुला कुणी सांगितलं मी ती बदलणार आहे म्हणून?"
"म्हणजे?", कविता प्रश्नांकित झाली, "पण एका महिन्यात बदलली नाहीस तर रिफण्ड मिळणार नाही."
"त्या साडीचा रिफण्ड हवाय तरी कुणाला.", कविताच्या आईने तिच्याकडे मिश्किलीत पाहिलं, "लग्नाच्या आदल्या दिवशी साखरपुड्यात आपल्या कामवाली बाईला नेसायला देणारेय मी ती."

****************

लठ्ठ ढोल श्रीम. काकडे, सुकड्या श्री. काकडेंसोबत ऑप्टीशियनकडे गेल्या.
"श्शी बाई!", श्रीम. काकडे दिलेल्या चश्म्यातून ट्रायल आरशात बघत म्हणाल्या, "ह्या चश्म्यातून मी किती जाडी, अवजड दिसतेय. असं वाटतंय आरश्यात मावतच नाहीये. मला वाटतं चश्मा फॉल्टी असावा.
ह्यावर श्री. काकडेंनी चेहेऱ्यावर काहीही भाव न देता शांतपणे ऑप्टीशियनला विचारलं, "कस्टमर सॅटिस्फॅक्शन कॅटलॉग कुठे आहे?"

****************
एकदा गणिताचे सर बंड्याला दहा ने गुणाकार शिकवत होते. त्यांनी एका गणितात तेरा दशांश दोन पाच ला दहा ने गुणले आणि उत्तरादाखल दशांशाचं टिंब खोडलं आणि बंड्याला विचारलं, "बंड्या सांग? दशांश चिन्ह कुठे गेलं आता? शोध बघू... "
बंड्या त्यांच्या हातकडे बघत म्हणाला, "डस्टरवर तर एवढी धूळ आहे.... कसं शोधणार त्यात मी?"

****************

एकदा मानसशास्त्राचे प्रोफेसर प्रोफ. विचारे, आचार्य अत्रेंच्या वर्गात शिकवायला आले. आचार्य तेव्हा पंधरा वर्षांचे असतील.
प्रोफ. विचारे: ह्या वर्गांत ज्याच्या मनात "मी मूर्ख आहे" हा न्यूनगंड आहे त्यांने कृपया न लाजता उभं रहावं.
पाच मिनिटं कुणीच उभं राहत नसल्याचं पाहून आचार्य अत्रेच उभे राहिले.
प्रोफ. विचारे: वाह! म्हणजे आपल्या मानसिक निर्बलतेला निर्भयपणे सामोरं जाणारा एकमेव विद्यार्थी ह्या वर्गात निघाला तर...
त्यांना मध्येच थांबवत कुमारवयीन आचर्य अत्रे म्हणाले: सर तुमची काहीतरी गफलत होतेय. तुम्हाला एकट्याला उभं असलेलं बघून मला रहावलं नाही म्हणून मी उभा राहिलो.

****************
एकदा गणिताच्या सरांनी बंड्याला प्रश्न केला, "बंड्या, सांग पाहू एका तारेवर पाच पक्षी बसले. मी एकाला दगड मारला तर किती उरतील?"
बंड्या म्हणाला, "एकही नाही."
सर दिमाखात म्हणाले, "हा तास गणिताचा आहे म्हणून बुद्धीसापेक्ष उत्तर सांगतोय. उत्तर आहे चार. पण जाउदे. पण मला तुझी विचार करायची पदधत आवडली."
ह्यावर बंड्याने गणिताच्या सरांना प्रश्न केला, "सर आता मी एक प्रश्न विचारतो. एका भाजी मंडईत तीन बायका आपल्या नवऱ्यांसहित भाज्या विकत घेतायत. एक तावातावाने भाजीवाल्याशी भांडतेय. दुसरी उदासपणे भाजी विकते घेतेय तर तिसरी लाजत अंग चोरत भय्याच्या दिलेल्या भाज्या पिशवित टाकताना ऒठ चावत नवऱ्याकडे बघत हसतेय. तर ह्या तिघींपैकी नवविवाहित कोण?"
सर थोडे ओशाळले पण उत्तरादाखल म्हणालेच, "जी लाजतेय ती."
बंड्या म्हणाला, "हा तास गणिताचा आहे म्हणून बुद्धीसापेक्ष उत्तर सांगतोय. उत्तर आहे जिच्या हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळ्सूत्र आणी हातात मेंदी आहे ती. पण जाउद्या. मला तुमची विचार करायची पदधत आवडली."

****************


जगभरात स्टॉकमार्केट्स अशीच चालतात!

एकदा अमेरीकन रेड इंडियन जमातीच्या लोकांनी त्यांच्या समाजाच्या पुढाऱ्याला विचारले, "तुम्ही शिकलेले आहात. तुम्हाला काय वाटते. ह्यावेळेस हिवाळा किती थंड असेल?"

आता तो पुढारी शिकलेला असला तरी ज्योतिषी किंवा निसर्गवेत्ता नव्हता. त्यामुळे हिवाळा थंड असेल की गरम हे तो असाच कसा सांगू शकेल? म्हणून मग त्याने त्या लोकांना नंतर धापवळ होऊ नये म्हणून, "हो! ह्यावेळेस हिवाळा थंड आहे. तुम्ही लाकडं आणि सरपण जमवायला लागा", असे सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे ती रेड इंडियन लोकं लाकडं जमवायला लागली.

इथे ‘आपण हिवाळा थंड आहे’, असं सांगून काही चूक तर केली नाही ना.... ह्या विचारात त्या पुढाऱ्याने अमेरीकन हवामानखात्याला फोन करून विचारले, "ह्यावेळेस नक्की हिवाळा थंड आहे का?"

हवामान खातं म्हणालं, "कोण बोलतंय? आणि तुम्ही असं का विचारताय?", तो म्हणाला, "मला असंच विचारायचं होतं. कारण मला वाटतं की ह्यावेळेस हिवाळ थंड असेल.", आणि असं म्हणून त्याने फोन ठेवला.

इकडे हवामान खात्याचा अंदाज ‘हिवाळ कमी थंड असेल’ असा होता. पण त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच.

म्हणून मग त्यांनी त्यांच्या हवामान आणि निसर्गविशेषज्ञाला बोलावले आणि त्याला विचारले.

त्याने म्हटले, "मला वाटतं ह्यावेळेस हिवाळा भरपूर थंड आहे."

असं म्हणताच हवामान खातं चकित झालं, "तुम्हाला असं का वाटतं? आमचा अंदाज तर ह्याऊलट आहे."

तेव्हा तो म्हणाला, "निसर्गाची चाहूलच सांगितेय.... तुम्हाला जाणवलं नसेल पण मी बघतोय. मागल्या काही दिवसांपासून रेड इंडियन्स वेड्यासारखी लाकडं जमवतायत..."

म्हणून हवामान खात्याने "ह्यावेळेस हिवाळा भरपूर थंड!" अंदाज टिव्हीवर दाखवला. तेव्हापासून अमेरीकेत उबदार कपडे, विंटर फॅशन, हिवाळ्यात इतर गरम देशांत आयोजित सहलींचे तिकीट्स, स्कीबोर्ड्स, हीटर्स आणि दारू विकत घेण्यास लोकांचा कल वाढला.

रेड इंडियन्स मात्र लाकडं जमवून स्वस्थ बसली होती....



तात्पर्य: जगभरात स्टॉकमार्केट्स अशीच चालतात!

*******************************************

ब्रिटनमधली स्कॉटीश लोकं धंद्यात तरबेज. तिकडचाच हा एक जोक.

ब्रिटनमध्ये रोडण्ट्स जातीचे (म्हणजे ससे, घुशी, खार किंवा तत्सम ) प्राणी हे सगळ्यात मोठी डोकेदुखी आहेत. एखाद्या मळ्यात, बागेत किंवा जंगलात त्यांचा सुळसुळाट झाला की त्यावर नियंत्रण करणे अगदी मुश्किल. महिनोन्महिने पेस्ट कंट्रोल केल्यावर मगच ती संख्या आटोक्यात आणली जाते. म्हणूनच ब्रिटन मधले शेतकरी खास ह्या प्राण्यांना मारण्यासाठी छोट्या बंदुका स्वतःकडे ठेवतात.

एक स्कॉटीश माणूस स्कॉटलण्डमधल्या अशाच एका रोडण्ट्सनी हैराण केलेल्या खेड्यात गेला. तिकडच्या शेतकऱ्यांची अवस्था पाहून त्याने एक सूचना जाहिर केली, "मी ह्या गावातले रोडण्ट्स विकत घ्यायला तयार आहे. १० रोडण्ट्सचे पाच पाऊण्ड."

म्हणजे प्रत्येक रोडण्टच्या मागे पन्नास पेन्स. आता ही बातमी म्हणजे आयताच नफा होता. गावकरी अशी संधी का सोडतील? त्यांनी रोडण्टस पकडण्यास सुरूवात केली आणि पकडलेले सारे रोडण्ट्स ह्या माणसाला आणून विकले. काही दिवस सातत्याने होणाऱ्या नव्या रोडण्ट्सचा भरणा त्या माणसाने आणलेल्या एका महाकाय पिंजऱ्यात होत गेला. काही दिवसातच १० रोडन्ट्स पकडणे गावकऱ्यांना मुश्किल होऊ लागले. कारण सगळ्यांनीच रोडन्ट्स पकडायला सुरूवात केल्याने रोडण्ट्सची संख्या रोडावली. इकडे पिंजऱ्यात १००० रोडण्ट्स जमले.

आजकल कमी माणसं रोडन्ट्स आणत असल्याचे पाहून त्या माणसाने दुसरी योजना जाहिर केली, "प्रत्येक पाच रोडण्ट्सचे पाच पाऊण्ड"

म्हणजे एका रोडण्टमागे १ पाऊण्ड. सही आहे!

गावकऱ्यांनी नव्या ऊमेदीने रोडण्टस पकडणे सुरू केले. ह्यावेळेस कसेतरी करून पाच पाच च्या ग्रुपने पकडलेले रोडण्ट्स गावकऱ्यांनी ह्या माणसाला प्रत्येकी ५ पाऊण्ड्सना येऊन विकले.

तिही संख्या काही दिवसात मंदावली. पिंजऱ्यात ५०० अधिक रोडण्टचा भरणा झाला.

मग त्या माणसाने तिसरी योजना जाहिर केली, "प्रत्येक रोडण्टचे ५ पाऊण्ड!"

"काय? हा माणूस वेडाबिडा तर नाही ना?", गावकऱ्यांनी विचार केला, पण खरंच तो प्रत्येक रोडण्टमागे पाच पाऊण्ड त्या गावकऱ्यांना देत होता. ह्याखेपेस गावकऱ्यांनी दुसऱ्या गावातून रोडण्ट्स पकडणे सुरू केले. पण हळूहळू तेही संपायच्या मार्गावर आले. पिंजऱ्यात कसेबसे १०० रोडण्ट्स नव्याने आले.
एकीकडे हे एवढे १६०० रोडन्ट्स पिंजऱ्यात बंदिस्त अन दुसरीकडे लोकांना द्यायचे पैसे. हे जमत नसल्याने त्या माणसाने एक मदतनीस नेमला आणि दोघांनी मिळून "प्रत्येक रोडण्टचे दहा पाउण्ड्स" अशी नवी योजना जाहिर केली. पण आता आली पंचाईत. लोकांना कुठेच रोडण्ट्स सापडत नवह्ते. सगळे ह्या माणसाने स्वतःकडे जमवून ठेवलेले.

ही योजना जाहिर करून काही दिवसातच, काही कारणास्तव तो माणूस शहरात निघून गेला.

इकडे त्याच्या मदतनिसाने लोकांना विश्वासात घेऊन सांगितले, "हे बघा नाहीतरी तुम्हाला रोडण्ट्स कुठे मिळणार नाहिच. ह्या पिंजऱ्यात एकूण १६०० रोडण्टस आहेत. मी ह्यातले १००० रोडण्ट्स तुम्हाला प्रत्येकी तीन पाऊण्ड्सनी विकतो. तुम्ही तो माणूस आल्यावर त्याला ते १० पाऊण्ड्सने विका म्हणजे तुमचाच ७ पाउण्ड्सचा फायदा होईल आणि माझ्या मालकाने ‘एवढे रोडण्ट्स गेले कुठे?’ असे विचारलेच तर मी त्याला ‘कसल्यातरी रोगाची साथ लागून मेले’ म्हणून सांगेन."

गावकरी खूश झाले. ही कल्पना भन्नाट होती. सगळ्यांनीच त्या मदतनिसाकडे रोडण्ट्स विकत घ्यायला सुरूवात केली. नंतर मागणी एवढी वाढली की त्या मदतनिसाने सगळेच १६०० रोडण्ट्स प्रत्येकी तीन पाऊण्डने विकले.

त्यांनतर एकदा तो मदतनिस गायब झाला आणि तो माणूसही शहरातून परतला नाही.

कशाला दिसेल? १५०० पाऊण्ड्स टाकून ४८०० पाऊण्ड्सचा कमवणाऱ्या त्यादोघांनी स्वतःचे १७०० पाऊण्ड्स वाटून गेऊन आपापल्या वेगळ्या वाटा केव्हाच पकडल्या होत्या.....

खेड्यातल्या लोकांच्या नशिबी मात्र आधीपेक्षाही जास्त रोडण्ट्स आले होते!




तात्पर्य: स्टॉकमार्केटमध्ये आपले स्वागत आहे!

किस्से लहान बंड्याचे

बंड्या त्याच्या साश्रूनयनी आईकडे बघत होता. त्याची आई कांदे कापीत होती.
"आई चश्मा काढ ना!"
"का रे!", नाक डोळे पुसत त्याच्या आईने विचारले
"अग चश्म्यात जास्त दिसतं."
"मग?"
"अगं मग जास्त नाही का झॊंबणार!"

------------------
बंड्या त्याच्या बाबांसोबत डिस्कवरी चॅनल बघत होता. त्यात एका सिंहीणीच्या पोटातून पाच बछडे जन्माला येत असल्याचे दृश्य होते.
बंड्याचे बाबा म्हणाले, "बघितलास बंड्या निसर्गाचा चमत्कार!"
बंड्या बाबांकडे संशयित नजरेन म्हणाला, "आता एवढी बछडी खाल्यावर, तिला अपचन होणारच होतं!"

-------------------
आज बंड्याचा पाचवा वाढदिवस. आजी आजोबा, मावशी, काका सगळे घरी जमले होते.
त्याच उत्साहात बंड्याने जोरात सुरूंग फोडला. झालेल्या आवाजाने बंड्या ओशाळला.
"काय बंड्या काय झालं?" आजोबांनी मिश्किलीत म्हणाले.
"माझी छाती पोटात पंक्चर झाली.", बंड्याने कारण दिले.

चॅटरूम

आपण कित्येक वेबसाईट दररोज बघतो, कित्येक संकेतस्थळांना रोज भेट देतो. त्यामुळे ह्यातल्या काही वेबसाईट्स विनोदी नसल्या तरी त्यातल्या मजकुराने विनोद साधतात. असेच काही विनोद इथे सांगत आहे ....

रेडिफ.कॉम वर न्यूज वाचताना काही वाचक आपल्या संवेदनशील प्रतिक्रिया देतात पण त्यात बरेच सांप्रदायिक आणि जात, धर्म अथवा भाषिक कट्टरपंथी आपली प्रति-प्रतिक्रिया देत गरळही ओकत असतात. ताजमहाल जगातल्या नव्या सात आश्चर्यांत सामिल झाल्याची बातमी वाचून त्यावरही अशाच संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या... त्या अशा (ह्यातला गंभीर आक्षेपार्ह मजकुर वगळला आहे तरी थोडा चावटपणा इंग्रजीत ठेवलाय.)

बातमी - ताज जगातल्या सात नव्या आश्चर्यांत सामील....

१. छान बातमी आहे.
_________(आता अशा थंड प्रतिक्रिया नेहेमी बासनात गुंडाळल्या जातात. त्याना प्रति-प्रतिक्रिया मिळत नाहीत हे ध्यानात असावे)

२. मीनाक्षी मंदिर ताजच्या शेकडो वर्षां आधीचे आहे, ते नव्या आश्चर्यात यायला हवे. आपली हिंदू संस्कृती ताज मधल्या मस्जिदीत नाही तर मीनाक्षी मधल्या मंदिरात आहे ... के. सेल्वराज.
_________त्यावर प्रतिक्रिया....
_________२.१ मीनाक्षी कोण रे? ... माणिक
_________२.२. शेषाद्री! ... सुकू
_________२.३ नाही तो मंदिरा बेदीविषयी बोलतोय ... प्रियश
_________२.४ मंदिरा इज हॉट!!! ... सुकू

३. ताज म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या गळ्यातले ताईत !!! ... ऍनॉनिमस
_________त्यावर प्रतिक्रिया....
_________३.१ माझ्या गळ्यात ताज नाही तर माझ्या कोकाकोलाचा फोटोलॉकेट आहे. शी इज माय गल. ... जुगल
_________३.२ आय एम गे. आय हेट गल्स. ... रायन
_________३.३ गेट आऊट यु बास्टर्ड. आय हेट गेज. ... जुगल
_________३.४ पीपल हू हेट गेज आर गेज देम्सेल्व्ज. ... रायन
_________३.५ अरे पण हा मजकूर ताज विषयी आहे ना? ... प्रिया.

४. ताज निवडून यावा म्हणून भारतीयांनी एवढे एसेमेसेस पाठवलेत की बक्कळ पैसा जमवला असणार त्या संस्थेने. मग काय एवढी लाच खाल्यावर कुणी उद्या व्हीटी स्टेशनावरचा संडासही सात आश्चर्यात सामील करेल. ... यास्मिन
_________त्यावर प्रतिक्रिया....
_________४.१ कुठला तो तिकीट खिडकीच्या बाजूचा ना? खरंच. यक्क! ... जैना
_________४.२ नथिंग बीट्स सुलभ शौचालय इन धारावी! ... सुकू
_________४.३ तू धारावीत जाऊन आलायस? वॉव्व! मला जायचेय तिथे. ... जैना
_________४.५ आय एम गे. आय लाईक पब्लिक मेन्स टोयलेट्स. ... रायन
_________४.६ यु आर सिक्क! ... जुगल

५. मी लहान होतो तेव्हा ताज पाहिला होता पण आता आठवतही नाही. ... समीर
_________त्यावर प्रतिक्रिया....
_________५.१ मग काय उपयोग पाहून? ... युजर४२०
_________५.२ पाहिल्याचे समाधान, अजून काय? ... जैना
_________५.३ तसं नाही पण जर ताज खरंच एवढा सुंदर असता तर मला लक्षात राहिला असताच. माधुरी दीक्षितचं धक धक गाणं तेवढाच लहान असताना पाहिलेलं मी. ते मला लख्ख आठवतंय. ... समीर
_________५.५ ऊम्म्म्म माधुरी दीक्षित , यम्मी!!!! ... युजर४२०
_________५.६ यु आर सिक ४२०! ... रायन

६. भारत माता की जय! ... पेट्रीयट
_________त्यावर प्रतिक्रिया....
_________६.१ बोअर नको करूस! ... साकेत
_________६.२ गर्व से कहो हम हिंदू है ... के सेल्वराज.
_________६.३ अल्ला हु अकबर अल्ला.... ... यास्मिन
_________६.५ बुद्धम शरणम गच्छामि ... ऍनॉनिमस
_________६.६ यु ऑल आर सो गे! एलोएल ... रायन
_________६.७ हु वॉण्ट्स रायन आउट? ... जुगल
_________________६.७.१ मी ... पेट्रीयट
_________________६.७.२ मी टू ... के सेल्वराज.
_________________६.७.३ मी थ्री ... प्रियश
_________________६.७.३ कशाला उगीच? आय थिंक ही इज क्यूट! ... यास्मिन
_________________६.७.४ आर यु केझी? ही इज गे! ... जुगल
_________________६.७.५ अ गर्ल इस प्रैज़िंग मी? आय एम गोन्ना प्युक!! ... रायन
_________________६.७.६ ही फोरम नक्की ताज साठीच आहे ना? ... प्रिया

७. वाह ताज वाह!!! झाकिर हुसेन तबला वाजवित चहा कसा पीत असेल हो? ... शमित
_________७.१ काय माहित? ... ऍनॉनिमस
_________७.२ स्ट्रॉ ने! ... युजर४२०
_________७.३ यु आर सो क्लेवर!!! ... शमित

एकटा जीव सदाशीव

एक होता भोळा जीव
त्याचं नाव सदाशीव
त्याच्या लाईफचा एकच फंडा
शहरी जाऊनच करावा धंदा.
धंदा करायच्या आशेने मग
तो मुंबईस दादरला पोचला
सिद्धिविनायला साकडं घालून
मग भटजीला नारळही वाटला.

सुदैवाने स्टेशनी त्याला
मस्त जागाही मिळाली
काही दिवसात दिमाखात मग
खाणावळही उभी राहिली.
’श्रीगणेश वेज’ म्हणून
तिचे नामकरण करीले
पहिल्या दिवशी दोन गिऱ्हाईक
नवं हॉटेल बघून शिरले.

पुढचे दिवस मात्र सदूचे
पार कठीण स्थितीत गेले
वेटर तर वेटर पण
आचारीही दांड्या मारीत गेले.
असल्या स्थितीत सदूचा
धंदा काही जमेना
दोन आकड्याच्या पुढे
गिऱ्हाईकसंख्या जाईना.

विटलेल्या सदूची मग
अगदी तारांबळ उडाली
हॉटेलचा धंदा करायची
ऊर्मीच सगळी गळाली.
सदूस बिचाऱ्यास काय
करावं ते कळेना
हॉटेल शिवाय पण दुसरा
कुठलाच धंदा वळेना.

मग एके दिवशी अचानक
एक चमत्कार झाला
सिद्धीविनायकास सदूच्या
नारळाचा साक्षात्कार झाला.
गणेशाच्या कृपेने मग
एक मोठा कन्सल्टण्ट आला
बाकी हॉटेलातली गर्दी पाहून
रिकाम्या "श्रीगणेश वेज" मध्ये गेला.

गल्ल्यावर बसलेल्या सदूचा
पडलेला चेहेरा पाहून
कन्सल्टण्ट म्हणाला सदूला
अगदीच न रहावून.
"काय झाले तुम्हाला ?
मी मदत करू?"
सदू म्हणे, "काय करू अहो
गिऱ्हाईक लागलेत गळू."

कन्सल्टण्ट पाही सभोवारी
म्हणे होटेल न्याहाळून नीट
"ह्या मस्त जागेवर बघा
*** बसेल अगदी फीट!"
सदूने कानाला लावला हात
म्हणे, "शिव शिव! नाही करायचं हे पाप"
कन्सल्टण्ट उपहास्य हसून गेला
सदू हळूच जान्हव चाचपून गेला.

मात्र आज त्या सदूच्या मुलाची
तीच खाणवळ कित्ती चालली
सगळे झाले चकित, म्हणती
"त्याला बरकत कशी लाभली?"
सदूने बांधला बंगला गिरगावात अन
सिद्धीविनायक ट्रस्टच्या यादीत आहे नाव
कारण तेच ‘श्रीगणेश नॉनवेज आणि बार’
सद्ध्या फॉर्मात सुरू आहे राव!!!!

लालूजीके बिहार में ट्रेनभी धक्का मारके चलती है!!!

एक बातमी. तशी फुटकळ पण मनोरंजनाची हमी असलेली...

बंद पडलेली रिक्षा, टॅक्सी, बस, किंवा ट्रक यांना तुम्ही स्वतः कधी ना कधीतरी धक्का मारला असेलच. पण ट्रेन ला धक्का मारायला मिळणे म्हणजे अलभ्यलाभ!! ह्यासाठी तुम्हाला रेल्वे मंत्री लालूजींच्या बिहार मध्ये जायला हवं.

नवी दिल्ली-हावडा मार्गावरती मुगलसराय-दानापूर विभागात बक्सर स्थानकाजवळ मंगळवारी (१६ मे ला) एका प्रवाशाने चेन खेचल्यामुळे एक शटल न्यूट्रल झोन मध्ये थांबली. रेलेवे मार्गावर ज्या भागात ओव्हरहेड वायर नसते त्याला न्यूट्रल झोन म्हणतात. ऎरवी रूळावर धावणारी ट्रेन ह्या झोन मध्ये आली तरी आपल्या संवेगामुळे न्यूट्रल झोनचे एवढे अंतर पार करू शकते. परंतु ह्या झोनमध्येच गाडी बंद पडल्याने ती पुन्हा सुरू करण्यासाठी विजेचे कनेक्शन हवे होते. त्यामुळे ड्रायव्हर ने हे इंजिन इतर बोग्यांपासून सोडवले अन ४०-५० प्रवाशांच्या मदतीने इंजिन धक्के मारून हे इंजिन ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आणले!

काही लोकांच्या मते सगळ्या ट्रेनला धक्का मारण्याचही एक वायफळ प्रयत्न त्याधी झाला होताच!!!

मॉडर्न अभंगवाणी


मनातल्या संहितेची सुरूवात हरिनामाने करावी असं संत म्हणतात. .. मी म्हणतो, संतांचीच इच्छा असेल तर हे घ्या.
..


शेजाऱ्याच्या घरी असावा पेपर । तोचि वाचावा न खर्चिता स्वधन ॥
पेपरसंगे ग्राह्य दूध वाटि एक । साखरेजोडि तेहि मागावे ॥

संगणकतज्ञ होशिलही तू । विठुमाझा करिल चमत्कार ॥
फक्त परीक्षेअंती निकाल । केटि न लागु द्यावी ॥

महाविद्यालय प्रस्थाने जीन्स अन टि-शर्ट । जेतुके फाटके तेतुके स्टायलिश ॥
ओळखावा एक कन्यकांचा जमाव । पाहावे प्रत्येकीस सांगोपांग ॥

किकेटी असावी भल्यांची भरती । करावे कसे बुकी-फिक्सिंगचे उच्चाटन? ॥
किंतु तयांच्याच चरणी मिळे धन । ऑस्ट्रेलिया मागे मीही लावतो ॥

स्टेशनी होता बळाबळी । करावी सुंदोपसुन्दी जरूर ॥
किंतु दिसता पुष्ट गृहस्थ । व्हावे मूक मार्गस्थ, विन्या म्हणे ॥

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपले ॥
तोचि राजकारणी ओळखावा । मतदान उपरांति विसरावा ॥

लहानपण देगा देवा । हाति लॉलिपॉपच हवा ॥
चिप्स, चॉकोलेट अन कार्टून्स । जीव सत्कारणी रमावा ॥

व्हावा सख्यासोबतींचा संग । सोमरसाचा मिळावा ब्रह्मानंद ॥
ऎकावे विन्याचे अभंग । आनंदाचे डोही आनंद तरंग ॥

--- साक्षात्कार - विन्याबुवा